सुखी संसाराची 'साथ' वर्षे, ती भारत फिरायला आली अन् चक्क 'गाईड'च्याच प्रेमात पडली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 09:35 PM2018-12-05T21:35:44+5:302018-12-05T21:38:52+5:30
सात वर्षांपूर्वी पहिल्यांदा भारतात येणारी मारी आज बोलीभाषा, संस्कृती आणि मनाने पूर्णपणे भारतीय बनली आहे.
भोपाळ - प्रेमाला भाषेचं, जागेच, गरिब-श्रीमंतीच किंवा कुठलंच बंधन असत नाही. अशीच एक छोटीसी लव्ह स्टोरी प्रेमी युगुलांना प्रेरणा देऊन गेली. फ्रांसच्या पॅरीसमध्ये राहणारी मारी सात वर्षांपूर्वी भारत भ्रमंतीवर आली होती. त्यावेळी 33 वर्षांच्या मारीला 'गाईड' करणाऱ्या 'टुरिस्ट गाईड' युवकाच्या ती प्रेमात पडली. विशेष म्हणजे तिने या युवकाशी लग्न करुन संसारही थाटला. आज मारी तिच्या पतीसोबत मध्य प्रदेशातील मांडू येथे राहत आहे.
सात वर्षांपूर्वी पहिल्यांदा भारतात येणारी मारी आज बोलीभाषा, संस्कृती आणि मनाने पूर्णपणे भारतीय बनली आहे. तर आता आपलं स्वत:च्या हक्काचं घर बांधण्यासाठी मारी काबाडकष्ट करत आहे. त्यासाठी तिचे घर उभारणाऱ्या गवंड्यासोबत ती बांधकामाचे काम करते. मारीचे वडिल डॉक्टर असून तिची आई शिक्षक आहे. त्यामुळे तिनेही आईचा वारसा जपत शिक्षण क्षेत्र निवडले. फ्रान्समधील मुलांना ती आजही ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे देते, गरजेनुसार नोट्सही काढून देते.
धीरजसोबत लग्न केल्यानंतर आता मारी दोन मुलांची आई आहे. मारीला दोन्हीही 2 मुलेच असून मोठा मुलगा 5 वर्षांचा तर दुसरा मुलगा 3 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे या दोघांचाही जन्म वेगवेगळ्या राज्यात झाला आहे. आता मुलांकडे लक्ष देत त्यांना हिंदी अन् फ्रेंच भाषचे धडेही देते. मुलांसाठी भारतीय पद्धतीचं जेवणही मारी बनवायला शिकली आहे. तर त्यांच्या आरोग्यसंबंधी काही अडचण भासल्यास साता समुद्रापार आपल्या वडिलांना फोन करुन ती सल्लाही घेते. मारीचा असा हा सुखी संसार सुरू असल्याने प्रेमाला कुठलही बंधन नसतं किंवा प्रेम आंधळ असतं, हे मारीनं सिद्ध करुन दाखवलंय, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.