पहिल्याच दिवशी लखनऊ मेट्रोमध्ये बिघाड; प्रवाशांना शिडीच्या मदतीने उतरवलं मेट्रोतून
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 12:28 PM2017-09-06T12:28:55+5:302017-09-06T18:31:35+5:30
मोठा गाजावाजा करून मंगळवारी उद्धाटन करण्यात आलेल्या लखनऊ मेट्रोमध्ये पहिल्याच दिवशी बिघाड झाला.
लखनऊ, दि. 6- मोठा गाजावाजा करून मंगळवारी उद्धाटन करण्यात आलेल्या लखनऊ मेट्रोमध्ये पहिल्याच दिवशी बिघाड झाला. दोन वर्ष अकरा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर लखनऊ मेट्रो सुरू झाली, पण मेट्रो सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रोत बिघाड झाल्याने जवळपास एक तास आलमबाग स्टेशनवर मेट्रो उभी होती. त्यानंतर दुसऱ्या मेट्रोच्या मदतीने बिघाड झालेली मेट्रो हटवण्यात आली. तसंच बिघाड झालेल्या मेट्रोत असणाऱ्या प्रवाशांना शिडीच्या मदतीने मेट्रोतून उतरवण्यात आलं.
Lucknow Metro Rail service temporarily stopped near Alambagh station due to technical glitches, on its first public run. pic.twitter.com/QSsTL6cp0V
— ANI UP (@ANINewsUP) September 6, 2017
लखनऊ मेट्रो सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. लखनऊ मेट्रोमध्ये आलमबाग स्थानकाजवळ अचानक बिघाड झाला. त्यामुळे ही मेट्रो एक तास जवळपास रखडली होती. मेट्रोच्या दुरुस्तीसाठी इंजिनिअरही बोलवण्यात आले होते. या बिघाडामुळे मेट्रो वाहतूक विस्कळीत झाली होती. तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो विस्कळीत झाली असल्याचं स्पष्टीकरण लखनऊ मेट्रोच्यावतीने देण्यात आलं. ‘सकाळी ७.१५ वाजता मेट्रो चारबागहून ट्रान्सपोर्ट नगरला जात होती. यावेळी दुर्गापुरी आणि मावैया स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. मेट्रोमुळे झालेल्या बिघाडामुळे आपत्कालीन ब्रेक वापरुन ती थांबवण्यात आली,’ अशी माहिती लखनऊ मेट्रो रेल कॉर्पोरेशनने प्रसिद्धीपत्रकातून दिली. मेट्रो बिघाडावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत मेट्रो प्रशासनावर राग व्यक्त केला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल राम नाईक आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लखनऊमधील मेट्रो सेवेचं उद्धाटन केलं. पण उद्धाटनानंतरच्या पहिल्याचं दिवशी मेट्रोमध्ये बिघाड झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना त्यांचा चांगलाच मनस्ताप झाला.
लखनऊमध्ये मेट्रो सध्या ट्रान्सपोर्ट नगर ते चारबागमध्ये धावणार आहे. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत लखनऊ मेट्रो सुरू राहणार आहे. लखनऊमध्ये मेट्रोतून प्रवास करण्यासाठी 10 रूपयांपासून ते तीस रूपयांपर्यंत तिकीटाचे दर ठेवण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशातील इतर दुसऱ्या शहरातही मेट्रो सुरू करण्यावर सध्या विचार सुरू आहे. त्यासाठी यूपी मेट्रो कॉर्पोरेशनची निर्मिती करण्यात येइल, असं या उद्धाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.