लखनऊ: तुम्ही अनेकदा माकडांनी माणसांवर हल्ला केल्याच्या घटना ऐकल्या किंवा वाचल्या असतील. बऱ्याच ठिकाणी माकडांपासून सावध राहण्याचा इशारा देणारा बोर्ड तुम्ही पाहिला असेल. आता असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील लखनऊच्यामेट्रो स्टशनवर घडत आहे.
लखनऊच्या मेट्रो स्टेशनवर माकड्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत, यामुळे प्रवासी भीतीच्या छायेत वावरत आहेत. माकडांच्या दहशतीने सर्वसामान्यांसोबतच मेट्रो प्रशासनही हैराण झालंय. यावर आता मेट्रो प्रशासनाने एक तोडगा काढला आहे. माकडांपासून वाचण्यासाठी मेट्रो प्रशासनाने लंगुरांची(माकडाची एक जात) मदत घेतली आहे. स्टेशनवर माकडांचा सामना करण्यासाठी लंगुरांना आणलं आहे.
काय आहे प्रकार ?लखनऊ मेट्रोने माकडांना घाबरवण्यासाठी नऊ मेट्रो स्थानकांवर लंगुराचे कटआउट्स लावले आहेत. स्टेशन कंट्रोलर विवेक मिश्रा यांनी सांगितले की, यापूर्वी माकडांना हाकलण्यासाठी स्पीकरवर लंगुरांचा आवाज लावण्यात आला होता, पण त्याचा जास्त परिणाम झाला नाही. त्यामुळेच आता प्रशासाने लंगुरांचे कटआउट्स लावण्याचा निर्णय घेतला. या कटआउट्ससह आवाजही लावला जातोय. या युक्तीचा माकडांवर किती परिणाण होईल, हे येणाऱ्या काळात कळेलच. पण, या कटआऊट आणि आवाजमुळे लोकांचे मात्र भरपूर मनोरंजन होत आहे.