भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, सत्तेसमीप चाललेल्या काँग्रेसमध्ये आता मुख्यमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. सोमवारी निकालांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या समर्थकांनी जोरदार पोस्टरबाजी केली होती. दरम्यान, आज ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांनी प्रदेश काँग्रेस कार्यालायासमोर पोस्टरबाजी केली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांनी लावलेल्या एका पोस्टरमध्ये शिंदे यांचे छायाचित्र मोठे दाखवले आहे. तर कमलनाथ यांचे छायाचित्र लहान दाखवले आहे. एवढेच नाही तर शिंदे यांच्या समर्थकांनी कार्यालयाबाहेर त्यांचे कटआऊटही लावले आहे. तर कमलनाथ यांच्या पाठीराख्यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वीच त्यांचे पोस्टर लावले आहेत. विशेष बाब म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे आणि कमलनाथ हे दोन्ही नेते निवडणूक लढलेले नाहीत. भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, सध्याच्या कलांनुसार काँग्रेस 115 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा 105 जागांवर आघाडीवर आहे. तसेच बसपा व इतर पक्ष मिळून 10 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये भाजपाला जबरदस्त धक्का बसण्याची शक्यता आहे.
Madhya Pradesh Assembly Election 2018 Results : कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदेंमध्ये पोस्टर वॉर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 3:50 PM