Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: रामनामाचा गजर, सनई चौघड्यांसह ५० वाद्यांचा निनादणारा मंगलध्वनी, पुरोहितांचे भारावून टाकणारे वैदिक मंत्रोच्चार अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात रामललांच्या मूर्तीची अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आणि संपूर्ण देशभरात जय श्रीरामचा जयघोष गुंजला. रामभक्तांचे पाचशे वर्षांचे स्वप्न साकार झाले. या सुवर्णक्षणाची भारतासह अवघे जग उत्सुकतेने वाट पाहत होते. या ऐतिहासिक दिवशी आणखी एक विशेष घटना घडली, ती म्हणजे एका मुस्लिम कुटुंबाने हिंदू धर्म स्वीकारला. विश्व हिंदू परिषदेने या कुटुंबाची घरवापसी करून घेतल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील अलीराजपूर येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी एका मुस्लिम कुटुंबाने हिंदू धर्म स्वीकारला. शहरातील अय्यूब उर्फ पिरू भाई यांनी पत्नी आणि दोन मुलांसह हिंदू धर्म स्वीकारला. आमचे पूर्वज हिंदू होते. त्यामुळे आम्ही घरवापसी करत आहोत. आम्हाला हिंदू धर्म, पूजापद्धती आवडते, असे या कुटुंबाने सांगितले. २२ जानेवारी या ऐतिहासिक दिवशी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पाद्यपूजन आणि वस्त्रे देत अय्यूब खान यांचे हिंदू धर्मात औपचारिक स्वागत केले. अय्यूब खान आता राजकुमार आणि त्याची पत्नी करिश्मा या नावाने ओळखली जातील.
हिंदू धर्म आणि पूजा-पद्धतीचा मोठा प्रभाव
VHP नेते मांझी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अय्यूबने आदिवासी मुलगी करिश्माशी लग्न केले होते. आपल्या पत्नीसोबत राहत असताना मुस्लिम अय्यूबने हिंदू धर्म आणि पूजा पद्धती पाहिली आणि समजून घेतली. याचा मोठा प्रभाव अय्यूब यांच्यावर पडला. यानंतर त्यांनी विश्व हिंदू परिषदेशी संपर्क साधून कायदेशीर मार्गाने हिंदू धर्म स्वीकारला. अय्यूब यांच्या घरवापसीची घोषणा करताना विहिंपच्या लोकांना खूप होत आहे, असे मांझी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी ११ दिवसांचे अनुष्ठान ठेवले होते. या सोहळ्यासाठी गर्भगृहात आल्यावर मुख्य पूजेपूर्वी अकराव्या दिवसाचे विधी, पूजन व संकल्प केला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर स्वामी गोविंददेव महाराज यांच्या हस्ते चरणामृत ग्रहण करत अनुष्ठान पूर्ण केले. पंतप्रधान मोदी यांनी मंदिर परिसरातील कुबेर टिळा येथील शिव मंदिरातही पूजा केली व जटायू मूर्तीचे अनावरण केले. त्यानंतर राम मंदिराच्या निर्माण कार्यात सहभागी श्रमिकांवर पुष्पवर्षाव केला.