धार - 'एमपी गजब है, सबसे अजब है' ही मध्यप्रदेशच्या पर्यटन विभागाची जाहिरात खूप गाजली होती. काल समोर आलेल्या घटनेनंतर आता 'एमपी गजब है, सबसे अजब है' असे वाटायला लागले आहे. कारण आरोग्य तपासणीदरम्यान पोलीस हवालदार पदासाठी निवड करण्यात आलेल्या आरक्षित वर्गातील उमेदवारांच्या छातीवरच त्यांची जात लिहल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकारामुळं मध्यप्रदेशमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यात आरक्षित जागेसाठी पोलिस भरती सुरु आहे. या भरतीदरम्यान आरोग्य तपासणी सुरु असताना पोलीस हवालदार पदासाठी निवड करण्यात आलेल्या आरक्षित वर्गातील उमेदवारांच्या छातीवरच एससी, एसटी असे लिहिण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे सोशल मीडियावर नेटीझन्सकडून सरकारवर टीका व्यक्त होत आहे.
धार जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी आरक्षित जागांसाठी भरतीचे अभियान चालवले गेले. सध्या निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची आरोग्य तपासणीही सुरु आहे. ओबीसी-एनटीसाठी 168 सेमी आणि एस-एसटीसाठी 165 सेमीची मर्यादा आहे. आरोग्य तपासणीसाठी आलेल्या उमेदवारांच्या ओळखीसाठी जिल्हा रुग्णालयाने मात्र एक वेगळीच पद्धत अवलंबली. तपासणीदरम्यान आरक्षित वर्गाच्या उमेदवारांच्या थेट छातीवरच त्यांचा वर्ग नमूद करण्यात आला. असा प्रकार घडल्याचे पोलीस अधीक्षक वीरेंद्र सिंह यांनी मान्य केले. या प्रकाराबाबत माहिती देताना ते म्हणाले की, गेल्या वेळी उमेदवारांची आरोग्य तपासणी होत असताना काही चूका झाल्या. अशा चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी रुग्णालयाने असे केले का हे तपासण्यात येत आहे. मात्र, रुग्णालयाने असे नेमके कशासाठी केले याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असेही सिंह म्हणाले.