भोपाळ - गुरुवारी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी देशभक्तीचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपावर जोरदार टीका केली. हे लोक आम्हाला देशभक्तीचे धडे देत आहे. नरेंद्र मोदींनी एकतरी नाव सांगावं, तुमच्या पक्षातील कोणी स्वातंत्र्य लढ्यात होतं का? तुमच्या नातेवाईकाचं, घरातलं कोणी होतं का? यांच्यातला एकही स्वातंत्र्यसैनिक नव्हता आणि हे आम्हाला देशभक्तीचे धडे देत आहेत अशा शब्दात त्यांनी भाजपावर जहरी टीका केली आहे.
यावेळी बोलताना कमलनाथ म्हणाले की, आपल्या देशाची संस्कृती सहिष्णुता आहे. संविधानाचे मूल्य अधिक आहे. आज यावर अनेक हल्ले होताना दिसत आहेत. याचा भविष्यावर मोठा परिणाम पडणार असून त्यामुळे सेवादलाचं योगदान मोठं असेल. विविधतेने नटलेला देश म्हणून जग भारताकडे पाहतं. विविधतेत एकता ही आपली शक्ती आहे पण आता त्यावर हल्ला होत होते. हे लोक एनआरसीची गोष्ट सांगतात असं त्यांनी सांगितले.
तसेच लोकांना गैरसमज निर्माण करण्याच्या गोष्टी करतात. भाजपाचं मागील सहा-सात वर्षाचं राजकारण पाहिल पाहिजे. अलीकडे लोकसभा निवडणुकीच्यावेळी जनतेचे लक्ष विचलित केलं गेलं. आज देशासमोर अनेक प्रश्न आणि आव्हानं आहेत मात्र त्याची उत्तरं मिळत नाही. तुम्ही कधी मोदींना ऐकले असेल तर त्यांनी शेतकरी आणि तरुणांबद्दल कोणते विचार मांडले आहेत का? असा सवाल कमलनाथ यांनी उपस्थित लोकांना केला.
दरम्यान, एनआरसीचा अर्थ नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजन्स, जेव्हा आपण नाव नोंदणी करायला जाल तर तुम्हाला प्रश्न केला जाईल की तुमचा धर्म कोणता आहे. तर तुम्ही सांगाल हिंदू. मग तुमच्याकडे हिंदू असल्याचा पुरावा मागितला जाईल. मग तुमच्या वडिलांचा धर्म काय? आजोबांचा धर्म काय? पुरावा आहे का? यामध्ये काय लिहिलंय त्यापेक्षा काही नाही लिहलं याची चिंता आहे आणि हे लोक विरोधकांवर गैरसमज पसरवत असल्याचा आरोप करत आहेत असा टोलाही मध्यप्रदेश मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.