भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. राज्यातील 230 जागांसाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली. मात्र, कुठे ईव्हीएमचा बिघाड तर कुठे निवडणूक अधिकाऱ्यांचा मृत्युमुळे या निवडणुकीला गालबोट लागले आहे. गुना येथील निवडणूक कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. तर इंदौर येथेही दोन निवडणूक कक्ष अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील 230 जागांसाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही मतदान प्रकिया पार पडणार आहे. मात्र, अनेक ठिकाणी ईव्हीएमच्या बिघाडामुळे मतदान प्रकिया काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. तर इंदौरमध्ये दोन निवडणूक अधिकाऱ्यांचा ह्रदय विकारने मृत्यू झाला आहे. या घटनेने मतदान केंद्रावर खळबळ उडाली असून पोलीस बंदोबस्तात पुन्हा मतदान सुरू झाले आहे. येथील दीपिका बाल मंदिरच्या नेहरू नगरमधील निवडणूक अधिकारी कैलाश पटेल (शिक्षक - उत्कृष्ट विद्यालय मुहू) यांना सकाळी 6.50 वाजता ह्रदय विकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जिल्हाधिकारी यांनी पीडित कुटुंबाला 10 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर गुना येथेही एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कामावरील ताण-तणावामुळेच पटेल यांना ह्रदयविकाराच झटका आल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.