विवाहाचे आमिष दाखवून ‘संबंध’ ठेवणे हा बलात्कारच - उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 02:56 AM2018-05-05T02:56:19+5:302018-05-05T02:56:19+5:30
महिलेचे शरीर हे पुरुषाचे खेळणे नाही, असे ठणकावून सांगत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने बलात्काराचा आपल्यावरील गुन्हा रद्द करावा, यासाठी केलेली एका तरुणाची याचिका फेटाळली. आपण संबंधित महिलेशी विवाह करणार नाही, हे माहीत असून, तिच्याशी शरीरसंबंध ठेवणे ही फसवणूकच आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
भोपाळ - महिलेचे शरीर हे पुरुषाचे खेळणे नाही, असे ठणकावून सांगत मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने बलात्काराचा आपल्यावरील गुन्हा रद्द करावा, यासाठी केलेली एका तरुणाची याचिका फेटाळली. आपण संबंधित महिलेशी विवाह करणार नाही, हे माहीत असून, तिच्याशी शरीरसंबंध ठेवणे ही फसवणूकच आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
भोपाळमध्ये नृत्याचे वर्ग चालवणाऱ्या महिलेने तेथील राजीव शर्मावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यांची फेसबुकवर ओळख झाली व पुढे त्याचे प्रेमात रूपांतर झाले. शर्माने त्या महिलेला लग्नाची मागणी घातली. तिने तयारी दाखवल्याने त्यांचे लग्नही ठरले. पण शर्माच्या आईचा या लग्नास विरोध होता. मात्र आपण तुझ्याशी विवाह करूच, असे आश्वासन त्याने दिले. नंतर शर्माने तिच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली. तसे संबंध ठेवण्यास तिला भागच पाडले. पण नंतर विवाह करायला नकार दिला.
त्यामुळे महिलेने शर्माविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली. त्याविरोधात शर्माने उच्च न्यायालयात अर्ज केला. शरीरसंबंधांना तिची संमती असल्याने याला बलात्कार म्हणता येत नाही, असा त्याचा युक्तिवाद होता. त्यावर विवाहाचे आश्वासन देऊन, शरीरसंबंधांची संमती मिळवल्याने ही फसवणूकच आहे, असे न्यायालयाने म्हटले. विवाह करणार नाही, हे माहीत असताना संबंध ठेवल्याबद्दल ताशेरे झोडताना, महिलेचे शरीर हे पुरुषाचे खेळणे नाही, येथे शर्मा याने केलेले कृत्य निंद्य व शिक्षा होण्यासारखे आहे, असे सांगून न्यायालयाने त्याचा अर्ज अमान्य केला. (वृत्तसंस्था)
फाशीचा पुनर्विचार व्हावा, निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांचा अर्ज
नवी दिल्ली : निर्भया प्रकरणातील चौघांपैकी दोघांनी आपल्याला सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार व्हावा, यासाठी केलेल्या याचिकेवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राखून ठेवला.
दक्षिण दिल्लीत १६ डिसेंबर २0१२ रोजी वैद्यकीय शिक्षण घेणा-या मुलीवर बलात्कार व नंतर तिला धावत्या बसमधून फेकून देणे या प्रकाराने संपूर्ण देश हादरला होता. त्या प्रकरणात मुकेश, पवन गुप्ता, विनय शर्मा व अक्षय कुमार सिंग या चौघांना फाशी सुनावण्यात आली होती.
राम सिंग नावाच्या आरोपीने तुरुंगातच आत्महत्या केली होती. विनय शर्मा व पवन गुप्ता यांनी फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार व्हावा, अशी याचिका केली आहे. मुकेशच्या अशाच अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे, तर अक्षय कुमारचा अर्ज अद्याप सुनावणीला यायचा आहे.
बलात्कारांचे प्रकार सुरूच
बिहारशरीफ : बलात्काराविरोधात जनमत तयार होऊ न आणि केंद्र सरकारने कायद्यात कठोर बदल करूनही अशा प्रकारांत घट होण्याचे नाव नाही.
बिहारमध्ये स्वत:च्या १६ वर्षांच्या मुलीवर गेले वर्षभर बलात्कार करणाºया आणि तिला धमकावणाºया बापाला पोलिसांनी अटक केली आहे.
गुजरातच्या मोर्बी शहरात दोन वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. तिचा देह एका नाल्यापाशी सापडला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. रोजंदारीवर काम करणाºया दाम्पत्याची ही मुलगी होती.
आंध्र प्रदेशात आत्महत्या
एका ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाºया ५५ वर्षांच्या पुरुषाने आत्महत्या केल्याचे आढळून आले. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात हा प्रकार घडला. तो त्या मुलीचा नातेवाईक होता.
घरमालकास अटक
पंजाबच्या पतियाळा शहरात तीन वर्षांच्या मुलीवरील बलात्काराबद्दल घरमालकास अटक केली आहे. एक कुटुंब सुरिंदरकुमार यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होते. मुलीची आई कामावरून घरी आली, तेव्हा मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. तिला आम्ही रुग्णालयात दाखल केले, तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. तेव्हा घरमालकाने तिला बाहेर नेले होते, अशी माहिती मुलाने दिली, अशी तक्रार मुलीच्या आईने नोंदवली.