सरकारने मोठ मोठे दावे करूनही आरोग्य विभागाची यंत्रणा रुळावर येत नाही. ग्रामीण भागात निकृष्ट आरोग्य सेवा लोकांच्या जीवावर बेतल्या आहेत. अनेक ठिकाणी भोंगळ कारभार पाहायला मिळत आहे. अशीच एक संतापजनक घटना आता समोर आली आहे. आरोग्य विभागाचा निष्काळाजीपणा पाहायला मिळाला आहे. रुग्णालयात डॉक्टर नसल्याने उपचाराअभावी एका निष्पाप चिमुकल्याने आपल्या आईच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरने पत्नीचं व्रत असल्याने उशीरा आल्याचं कारण दिलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिन्हेटा देवरी येथील संजय पन्द्रे यांनी आपला पाच वर्षांचा मुलगा ऋषी पन्द्रे याला उपचारासाठी बरगी येथील आरोग्य केंद्रात आणले होते, मात्र तेथे डॉक्टरच नव्हते. आईवडील आणि नातेवाईकांनी आपल्या मुलावर उपचार व्हावेत यासाठी रूग्णालयाच्या दारात थांबून खूप वेळ वाट पाहिली. पण अनेक तास उलटून गेले तरी कोणीच डॉक्टर आले नसल्याने चिमुकल्याने आईच्या कुशीतच जीव सोडला.
चिमुकल्याचा मृत्यू होऊन अनेक तास उलटून गेले तरी रुग्णालयामध्ये डॉक्टर, बीएमओ कोणीच नव्हते. यामुळे कुटुंबीयांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी डॉक्टरांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केला आहे. वेळीच उपचार मिळाले असते तर मुलाचा जीव वाचला असता असं संतप्त नातेवाईकांचं म्हणणं आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्याचे लाखो दावे केले जात असले तरी रुग्णालयाच्या दारातच आईच्या कुशीत 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने व्यवस्थेवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
काही तास रुग्णालयात उशीरा पोहोचलेल्या डॉक्टरांनी उशीरा येण्याचं भलतंच कारण सांगितलं आहे. जे ऐकून धक्काच बसेल. पत्नीचं व्रत असल्याने उशीर झाल्याचं सांगितलं आहे. पण ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबाने आपल्या चिमुकल्याला कायमचं गमावलं आहे. मात्र या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.