कमलनाथ आमच्यापेक्षा दलालांवर अधिक विश्वास ठेवतात; बंडखोर काँग्रेस आमदारांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 12:08 PM2020-03-17T12:08:41+5:302020-03-17T12:09:41+5:30
कमलनाथ यांचा आमच्या सोबतचा व्यवहार चांगला नसल्याने आम्हाला काँग्रेसचा हात सोडवा लागला असल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे.
भोपाळ : मध्यप्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला असताना फरार झालेल्या आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आमचे अपहरण झाले नसल्याचे आमदारांनी आज स्पष्ट केले. तर यावेळी त्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला. कमलनाथ यांचा आमच्या सोबतचा व्यवहार चांगला नसल्याने आम्हाला काँग्रेसचा हात सोडवा लागला असल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे.
आपली भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसचे बंडखोर आमदार म्हणाले की, निवडणुका एकट्या छिंदवाड्याच्या जीवावर जिंकता येत नाही. मध्य प्रदेशची सरकार आम्ही सर्वांनी एकत्र येऊन स्थापन केली होती. मात्र त्यावेळी दिलेली वचन आता पाळली जात नाही.
तर आम्ही मंत्रिमंडळ बनविण्यासाठी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि आमच्यावर कसा अन्याय झाला आहे, हे त्यांना समजावून सांगितले. राहुल गांधींनी सुद्धा त्यावेळी आमच्यावर अन्याय झाला असल्याचं कबूल केले होते. मात्र मुख्यमंत्री हे स्वीकारायला तयार नाहीत. तर कमलनाथ हे आमदारांपेक्षा दलालांवर अधिक विश्वास ठेवतात असा आरोप सुद्धा या आमदारांनी यावेळी केला.
तर बंडखोर आमदार इमरती देवी म्हणाल्या की, ज्योतिरादित्य शिंदे हेच आमचे नेते आहेत. त्यांच्याकडून आम्ही बरच काही शिकलो आहोत. मी कायम त्यांच्यासोबत आहे. त्यांनी विहिरीत उडी मारण्याचा आदेश दिला तर आपण तेही करू असंही इमरती देवी म्हणाल्या.