ED Raid: कोलकाता, भोपाळ, आणि मुंबईसह एकूण 39 ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापे टाकले आहेत. महादेव एपीपीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कच्या विरोधात ईडीची कारवाई सुरू आहे. ईडीने मोठ्या प्रमाणात पुरावे गोळा केल्याचे सांगण्यात येत आहे. मोठी गोष्ट म्हणजे छापेमारीत ईडीने 417 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
ईडीने केलेल्या तपासात महादेव ऑनलाइन बुकिंग अॅप परदेशातून चालवले जात असल्याचे समोर आले आहे. अधिकृत माहितीनुसार, या अॅपची जाहिरात सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी केली होती. हे संयुक्त अरब अमिरातीतून चालवले जात होते. सट्टेबाजीतून कमावलेले पैसे परदेशी खात्यात पाठवण्यासाठी हवाला ऑपरेशन करण्यात आले. एवढंच नाही तर लाखो रुपये खर्चून वेबसाइटच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजीही करण्यात आली. अंमलबजावणी संचालनालयाने भोपाळ, कोलकाता, मुंबई आणि इतर अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यात ईडीने अनेक महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
काय आहे महादेव अॅप प्रकरण?महादेव अॅप बेकायदेशीर सट्टेबाजीसाठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये पत्ते, चान्स गेम, क्रिकेट, बॅडमिंटन यांसारखे खेळ खेळले जातात. या खेळांमध्ये बेकायदेशीरपणे बेटिंग केली जाते. छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि इतर अनेक राज्यांमध्ये या अॅपविरोधात मनी लॉन्ड्रिंगची अनेक प्रकरणे नोंदवण्यात आली होती. अॅपचे नेटवर्क केवळ भारतातच नाही तर शेजारील देश नेपाळ आणि बांगलादेशातही पसरले आहे, असे मानले जाते.
बॉलिवूडही ईडीच्या निशाण्यावरसध्या बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रीही ईडीच्या निशाण्यावर आहेत. यात अभिनेता टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओन, कृष्णा अभिषेक, राहत फतेह अली खान, विशाल ददलानी आणि इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे. भारती सिंग, नुसरत भरुचा, आतिफ अस्लम यांचीही नावे तपासाच्या कक्षेत येत आहेत. ईडीच्या रडारवर बॉलिवूडमधील 14 हून अधिक नावं असल्याचं सांगण्यात येत आहे.