बिहारमध्ये एनडीएला तडा; मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, काँग्रेसच्या हातात हात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 05:06 PM2018-12-20T17:06:15+5:302018-12-20T17:07:56+5:30
काँग्रेसप्रणित महाआघाडीत राष्ट्रीय लोक समता पार्टी सहभागी
नवी दिल्ली: बिहारमध्येभाजपाप्रणित एनडीएला तडा गेला आहे. मोदी सरकारमधून बाहेर पडलेले राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी काँग्रेसप्रणित यूपीएचा 'हात' धरला आहे. त्यामुळे बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक मित्र मिळाला आहे. या संदर्भात दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात बैठक झाली. यानंतर कुशवाहा यांनी महाआघाडीत प्रवेश करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे बिहारमधील भाजपाचा एक मित्रपक्ष कमी झाला आहे.
थोड्याच वेळापूर्वी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात एक बैठक झाली. या बैठकीला उपेंद्र कुशवाहा यांच्यासह बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्तीसिंह गोहिल, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, हिंदुस्तान अवाम मोर्चाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी उपस्थित होते. या बैठकीनंतर कुशवाहा यांनी आपण महाआघाडीत प्रवेश करत असल्याची घोषणा केली. 'माझ्याकडे बरेच पर्याय होते. मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मी यूपीएचा भाग होण्याचा निर्णय घेतला,' असं कुशवाहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
कुशवाहा यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. राजदचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी कुशवाहा यांचं महाआघाडीत स्वागत करत मोदींवर निशाणा साधला. ही देश आणि संविधान वाचवण्याची लढाई असल्याचं ते म्हणाले. 'सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. पंतप्रधान मोदींची हुकूमशाही करत आहेत. ज्यांनी जनतेचा फक्त आणि फक्त विश्वासघात केला, दिशाभूल केली, त्यांना जनता जोरदार प्रत्युत्तर देईल,' अशी टीका यादव यांनी केली.