Maharashtra Government: पवारांची गुगली अन् मोदींनी केलं कौतुक; नवनीत राणांची 'ही' मागणी पूर्ण होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 03:59 PM2019-11-18T15:59:38+5:302019-11-18T16:00:41+5:30
त्याचसोबत राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, शेवटच्या बॉलला सिक्स मारुन मी जिंकू शकते.
नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेचे पडसाद दिल्लीच्या राजकारणात उमटू लागले आहेत. शरद पवार आणि सोनिया गांधी यांची राज्यातील परिस्थितीवर आज चर्चा होणार आहे. मात्र तत्पूर्वी घडलेल्या घडामोडीतून महाशिवआघाडीच्या सत्तास्थापनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्याचदरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रपती राजवटीला सर्वस्वी शिवसेना जबाबदार असल्याचं सांगत राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येत सरकार स्थापन करावं असं विधान केलं आहे.
याबाबत बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना कौल दिला आहे त्यांनी सरकार बनवायला हवं होतं. शिवसेना-भाजपा महायुतीला कौल दिला आहे. मात्र राज्यातील राष्ट्रपती राजवटीला शिवसेना सर्वस्वी जबाबदार आहे. त्यांच्यामुळेच सत्तास्थापनेचा घोळ निर्माण झाला आहे. निम्म्या जागा असताना मुख्यमंत्रिपद मागणं चुकीचं आहे. त्यांच्यामुळेच राज्यावर राष्ट्रपती राजवट सुरु आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यास अडचण निर्माण होत आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच शरद पवारांनी देशाचं नेतृत्व केलं आहे. अनेकदा त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली आहे. पवारांनी नेहमी शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीने भाजपासोबत येऊन सरकार स्थापन करावं अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.
त्याचसोबत राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, शेवटच्या बॉलला सिक्स मारुन मी जिंकू शकते. तर शेवटच्या क्षणी काही घडेल सांगता येत नाही. शिवसेना आशेवर जगत आहे. शेतकऱ्यांसाठी, शेतकरी हितासाठी शरद पवारांनी भाजपासोबत यावं. केंद्रात भाजपाचं सरकार आहे त्यामुळे याचा फायदा निश्चित राज्यात सरकार बनविल्यावर होणार आहे असा दावाही नवनीत राणांनी केला.
दरम्यान, अधिवेशनापूर्वी पत्रकारांनी शिवसेनेसोबत मिळून महाराष्ट्रात कधी सरकार बनवता आहात, असे विचारले असता शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातल्या सरकारबद्दल शिवसेना-भाजपाला विचारा, शिवसेना-भाजपा वेगळे पक्ष आहेत, तसेच आमचे पक्षही वेगळ्या विचारधारेचे आहेत.“काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी स्वतंत्र लढली आणि शिवसेना-भाजप युती स्वतंत्र लढले. आता शिवसेनेला ठरवायचं आहे कोणासोबत जायचं आहे. त्यामुळे पवारांनी टाकलेली गुगली, मोदींने केलेलं कौतुक यामुळे राज्यात सरकार कोणाचं बनणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलं आहे.