नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करावी अशी बिहार सरकारने केलेली मागणी केंद्राने मान्य केली असतानाच, सीबीआय चौकशीला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात विरोध दर्शविला आहे. पाटण्याचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाइनमधून सोडण्यास मुंबई महानगरपालिकेने नकार दिला असून तसे पत्र बिहार पोलिसांना पाठविले आहे.
बिहारची राजधानी पाटणा येथील आयपीएस अधिकारी विनय तिवारी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. त्या कृतीमुळे चुकीची संदेश गेल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाचा स्थितीदर्शक अहवाल सादर करावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी पाटणा येथे नोंदविण्यात आलेला एफआयआर मुंबईमध्ये वर्ग करण्यात यावा अशी विनंती करणारी याचिका सुशांतची मैत्रिण रिया चक्रवतीर्ने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर बिहार, महाराष्ट्राची राज्य सरकारे, केंद्र सरकार तसेच सुशांतसिंह राजपूत याच्या वडीलांनी तीन दिवसांच्या आत उत्तर सादर करावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या याचिकेच्या सुनावणीप्रसंगी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी ही बिहार सरकारने केलेली शिफारस आम्ही मान्य केली आहे. सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्यास महाराष्ट्र सरकारने विरोध दर्शविला आहे. सुशांतसिंह राजपूत आत्मह्त्या प्रकरणी राजकीय हेतूने पाटणा पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे, असे महाराष्टÑ सरकारच्या वतीने सांगण्यात आले.बिहार पोलिसांना या प्रकरणी चौकशी करण्याचा कोणताही अधिकार नाही असा महाराष्ट्र सरकारचा दावा आहे.पाटणा येथील आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाइनमधून सोडण्यास मुंबई महानगरपालिकेने नकार दिला आहे. कोरोना साथीचा फैलाव लक्षात घेता विनय तिवारी त्यांच्या कामासाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी झूम, गुगल मिट, जिओ मिट, मायक्रोसॉफ्ट इत्यादी डिजिटल प्लॅटफॉर्मवरून संपर्क साधू शकतात, असे मुंबई महानगरपालिकेने बिहार पोलिसांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. तिवारी यांना क्वारंटाइनमधून सोडावे असे पत्र बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई महानगरपालिकेला लिहिले होते. पण त्यांची विनंती महापालिकेने मान्य केली नाही. ही माहिती पांडे यांनी टिष्ट्वट करून दिली आहे.रियाच्या चौकशीचा बिहार पोलिसांचा मार्ग मोकळाअभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीची बिहार पोलीस आता चौकशी करू शकतात. त्यातील अडथळा सर्वोच्च न्यायालयाने दूर केला आहे. अशी चौकशी करू नये म्हणून अंतरिम आदेश देण्याची रिया चक्रवर्तीने केलेली विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली नाही.