नवी दिल्ली - राज्यातील सत्तासंघर्षाचा आजचा आठवा दिवस आहे. विधान परिषद निवडणूक निकालानंतर सुरू झालेले बंड अजूनही सुरू असून आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. शिवसेनेतील फुटीर गटातील १६ आमदारांना महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिलेल्या अपात्रता नोटिशीला उत्तर देण्याची मुदत सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलैपर्यंत वाढवून दिली आहे. या नोटीसविरोधात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी येत्या ११ जुलैला होणार असल्याने महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेचे ढग इतक्यात विरणार नसल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान शिंदे गटातील आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी "उद्धव ठाकरे गटाला जे करायचंय ते करावं, आम्ही या लढाईसाठी पूर्णत: तयार" असं म्हटलं आहे.
भरत गोगावले यांनी "आम्ही पूर्ण तयारीनिशी इथे आलो आहोत. जर 11 जुलैपर्यंत इथे राहावं लागलं तरी चालेल, आम्ही तयार आहोत. ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय आम्ही परत येणार नाही. नियमांनुसार जी प्रक्रिया होणं गरजेचं आहे, ती केली जात आहे. आम्ही काळजीपूर्वक पाऊल उचलत आहोत, कारण छोटीसी तरी चूक झाली तर काहीही फायदा होणार नाही. आजच्या बैठकीत राज्यपालांना पाठिंबा काढल्याबाबत पत्र द्यायचं की नाही आणि जर द्यायचं असेल तर ते कधी या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. आमच्या गटातून कोणीही बंडखोरी करणार नाही. उद्धव ठाकरे गटाला जे करायचंय ते करावं, आम्ही या लढाईसाठी पूर्णत: तयार आहोत" असं म्हटलं आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटातील अनेक आमदारांनी उघडपणे संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि संजय राऊत असा सामना रंगला आहे. आताही संजय राऊत यांनी ट्विट करून शिंदे गटाला डिवचलं आहे. राऊतांनी एक शायरीच्या फोटो ट्विट करून टोला लगावला आहे. आम्ही अजूनही गुवाहाटीत असलेल्या आमदारांपैकी काहींना बंडखोर मानायला तयार नाही. २० हून अधिक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते आज सकाळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले असून अपक्षांनाही हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्यात नुकतेच फोनवर बोलणे झाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे हे वेळ पडल्यास आपला गट मनसेत विलीन करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज ठाकरे यांनी आपल्या'शिवतीर्थ' या निवासस्थानी मनसेच्या मोजक्या नेत्यांशी चर्चाही केली होती. या बैठकीत नक्की काय ठरले, हे माहिती नाही. मात्र, सध्याच्या घडामोडी पाहता या सत्तानाट्यात राज ठाकरे यांची एन्ट्री होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.