Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात सोनिया व राहुलसह प्रियांका गांधी यांच्याही सभा?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 04:59 AM2019-09-21T04:59:45+5:302019-09-21T05:00:21+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात प्रथमच उतरण्याची शक्यता आहे.
- सुरेश भुसारी
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात प्रथमच उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रियांका गांधी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील दोन प्रचार सभांमध्ये सहभागी व्हावे आणि यवतमाळ व नागपूर येथेही प्रियांका गांधी यांनी सभा घ्याव्यात, अशी प्रस्ताववजा विनंती प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीने केली आहे.
प्रियांका गांधी यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात एकही प्रचार सभा घेतलेली नाही. त्यांच्याकडे केवळ उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील प्रचाराची धुरा सोनिया व राहुल गांधी यांनी सांभाळली होती. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मुंबई, नागपूर, नंदुरबार, पुणे, औरंगाबाद, बीड व ठाणे येथे प्रचार सभा घेण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. राहुल यांच्या विदर्भ, मराठवाडा, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र व जळगाव येथे पाच प्रचार सभा घ्याव्यात, असेही प्रचार समितीने म्हटले आहे. अ. भा. काँग्रेस समितीने प्रदेश काँग्रेस प्रचार समितीच्या प्रस्तावावर उत्तर दिलेले नाही.
>निश्चित प्रभाव पडेल
प्रियांका गांधी यांच्या प्रचारामुळे काँग्रेसच्या प्रचारामध्ये निश्चितपणे वेगळा प्रभाव पडेल, असा दावा पटोले यांनी केला. प्रियांका गांधी यांच्यामध्ये लोक इंदिरा गांधी यांची प्रतिमा पाहतात, असेही ते म्हणाले.