मेहबुबा सरकारचा राजीनामा, अपवित्र युती संपल्याबद्दल काँग्रेसला आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 06:24 AM2018-06-20T06:24:54+5:302018-06-20T06:24:54+5:30
काश्मीरमधील बिघडत्या परिस्थितीचे कारण पुढे करीत आणि काश्मीर प्रश्नाबाबत अयशस्वी ठरल्याचा शिक्का पुसून काढण्यासाठी भाजपाने मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा अखेर मंगळवारी काढून घेतला.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : काश्मीरमधील बिघडत्या परिस्थितीचे कारण पुढे करीत आणि काश्मीर प्रश्नाबाबत अयशस्वी ठरल्याचा शिक्का पुसून काढण्यासाठी भाजपाने मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा अखेर मंगळवारी काढून घेतला. त्यानंतर, मेहबुबा यांनी ताबडतोब राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. हे होणे अपेक्षितच होते. तिथे राज्यपालांची राजवट लागू न करण्याचा व विधानसभा विसर्जित न करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
राज्यपाल एन. एन. वोहरा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राज्यपाल राजवटीचा प्रस्ताव पाठविला आहे. राज्यपालांना प्रशासन हाताळण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती केली जाईल. भाजपाने राज्यपालांना पत्र पाठवून सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा मेहबुबा मुफ्ती यांचा निर्णय रद्द करा, अशी मागणी केली आहे.
अमित शाह यांच्याशी सोमवारी मोदी यांनी चर्चा केल्यानंतर मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय झाला. त्या आधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा झाली. गृहमंत्री राजनाथ सिंहही त्यात सहभागी होते. त्यानंतर काश्मीरच्या भाजपा मंत्र्यांना दिल्लीत निर्णयाची माहिती दिली.
या निर्णयानंतर राजनाथ सिंह यांच्याकडे अजित डोवाल व गुप्तचर प्रमुख राजीव जैन व इतरांच्या उपस्थितीत बैठक झाली. राज्यपाल एन. एन. व्होरा व यांचीही चर्चा झाली. भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका पीडीपीवर ठेवला.
>मेहबुबा मुफ्ती यांची भाजपावर टीका
भाजपाने आघाडी तोडल्याबद्दल मुफ्ती यांनी टीका केली. आपले वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांना पीडीपीला पूर्ण काळासाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले होते, याची त्यांनी आठवण करून दिली. त्या म्हणाल्या की, आघाडीचा उद्देश एकतर्फी शस्त्रसंधी, पाकिस्तानशी चर्चा, ११ हजार युवकांवरील गुन्हे मागे घेणे, असा होता. पीडीपीने कलम ३७० चे समर्थन न्यायालयांत करून ते वाचविले. सलोखा व संवाद हा सरकारचा मुख्य उद्देश होता. शक्ती दाखविण्याचे धोरण कामाला येत नाही, असेही त्यांनी सांगितले. येथेच थांबून त्यांनी चेंडू पुन्हा मोदी सरकारच्या बाजूने ढकलला.
>पीडीपीतही नाराजी
सरकारमधील सहभागामुळे आपण देशातील हिंदू व्होट बँक गमावू, याची भीती भाजपाला होती, तर भाजपाला जवळ केल्याने काश्मीर खोºयातील मुस्लिमांचा मेहबुबा यांच्यावरील राग वाढल्याने पीडीपीमध्येही नाराजी होती. दहशतवाद वाढण्यास पीडीपी जबाबदार असल्याची शंका भाजपा नेते करीत होते, तर हिंदुत्ववादी पक्षाच्या साथीमुळे मुस्लीम तरुण अतिरेकाकडे वळत असल्याचे पीडीपी नेत्यांचे म्हणणे होते.
>भाजपाने मेहबुबांवर फोडले काश्मीरच्या स्थितीचे खापर
भाजपाने जम्मू-काश्मिरातील मेहबुबा मुफ्ती सरकारशी तीन वर्षांपूर्वीची आघाडी तोडताना राज्यातील बिघडत्या परिस्थितीचे खापर मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांच्यावर फोडले आहे. भाजपाचे महासचिव आणि राम माधव म्हणाले की, भाजपासाठी जम्मू-काश्मीर भारताचा अभिन्न भाग आहे. मात्र, सद्यस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी येथे राज्यपाल शासन आणले जावे, असा आम्ही निर्णय घेतला आहे.
>ती भाजपाची
चूकच होती
पीडीपीबरोबर जाऊ न भाजपाने हिमालयाइतकी मोठी चूक केल्याचे मी तीन वर्षांपूर्वीच म्हटले होते. तेव्हा भाजपाला ते मान्य नव्हते. आता ती चूक आपल्याकडून झाल्याचे भाजपाने मान्य केले आहे. आता राज्यात राज्यपाल राजवट आणावी.
- गुलाम नबी आझाद,
काँग्रेसचे नेते
>भाजपा-पीडीपी यांच्या संधीसाधू युतीने काश्मीरमध्ये आग भडकवली. त्यात अनेक निरपराध नागरिकांना प्राणास मुकावे लागले व आपल्या शूर सैनिकांना हौतात्म्य आले. संपुआ सरकारने केलेल्या कामावर या आघाडीने पाणी फिरविले. राज्यपाल राजवटीतही हे नुकसान सुरूच राहील. अकार्यक्षमता, मग्रुरी व द्वेष यांचा नेहमीच पराभव होत असतो.
- राहुल गांधी,
काँग्रेस अध्यक्ष
>विधानसभा बरखास्त करून राज्यात ताबडतोब निवडणुका घेण्यात याव्यात, अशी आमची मागणी आहे. तसे आपण राज्यपालांना भेटून सांगितले आहे.
- ओमर अब्दुल्ला,
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते
>चिंता अपयश झाकण्याचीच
काश्मीरमधून होणारे हल्ले वाढले, दहशतवादी हल्ल्यात वाढ झाली, त्यात असंख्य जवान शहीद झाले आणि सामान्य निरपराध नागरिकही मारले गेले. या साºयाचे खापर आपल्यावर फुटू नये, असे भाजपाला वाटत होते.
पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होत असल्याने, काश्मीर प्रश्नावर आपण अयशस्वी ठरलो, असा शिक्का भाजपाला नको होता. त्यातून पीडीपी व भाजपा यांच्यातील बेबनाव वाढत होता.
कथुआ बलात्कार घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लाल झेंडा फडकवला. अपयशी शस्त्रसंधीने पीडीपीचा पाठिंबा काढून घेण्यास भाजपाला कारण मिळाले व संपादक शुज्जात बुखारी यांच्या हत्येने सरकार जाणार हे निश्चित झाले. मोदी यांनीच आघाडी घडवून आणली होती व ती तोडलीही त्यांनीच.