'या' राज्यात निवडणुकीपूर्वीच AAP ला मोठा झटका! प्रदेशाध्यक्ष, संघटन महामंत्र्यासह अनेक नेते भाजपत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 11:05 AM2022-04-09T11:05:07+5:302022-04-09T11:05:36+5:30
"अरविंद केजरीवाल, पहाड आणि पहाडी आपल्या जाळ्यात अडकणार नाहीत."
नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच (Himachal Assembly Election) आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. आपचे हिमाचल प्रदेश अध्यक्ष आणि संघटन मंत्री यांनी भाजपत (BJP) प्रवेश केला आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत आपचे प्रदेशाध्यक्ष अनूप केसरी, संघटनेचे सरचिटणीस सतीश ठाकूर यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षात प्रवेश केला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करत दिली माहिती -
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर ट्विट करत म्हणाले, "अरविंद केजरीवाल, पहाड आणि पहाडी आपल्या जाळ्यात अडकणार नाहीत. आम आदमी पक्षाच्या हिमाचल विरोधी धोरणां विरोधात, AAP चे हिमाचल प्रदेश अध्यक्ष अनुप केसरी, संघटनेचे सरचिटणीस सतीश ठाकूर आणि उना अध्यक्ष इक्बाल सिंग यांनी आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मुख्य उपस्थितीत जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपत प्रवेश केला आहे. आपल्या सर्वांचे भाजप परिवारात स्वागत, अभिनंदन."
हिमाचलमध्येही होणार यूपीसारख्या विजयाची पुनरावृत्ती -
ठाकूर यांनी पुढे लिहिले, उत्तर प्रदेशात आपली सर्वच जागांवर जमानत जप्त झाली. हिमाचलही याची पुनरावृत्ती करण्यास तयार आहे. विरोधकही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावर आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आहेत, कारण त्यांचा विश्वास, "सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास" या ब्रीदवाक्यावर आहे.
भाजपाध्यक्ष हिमाचल दौऱ्यावर -
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा सध्या हिमाचल प्रदेशच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते अनेक संघटनात्मक आणि सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणार आहेत. पाच राज्यांतील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या जबरदस्त कामगिरीनंतर नड्डा यांचा हा पहिलाच राज्य दौरा आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते अनिल बलूनी यांनी शुक्रवारी सांगितले.