'शंभर दहशतवाद्यांची मुंडकी धडावेगळी करा आणि वडिलांच्या बलिदानाचा बदला घ्या'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 10:06 AM2017-10-05T10:06:37+5:302017-10-05T10:09:10+5:30
‘शंभर दहशतवाद्यांची मुंडकी धडावेगळी करुन वडिलांच्या बलिदानाचा बदला घ्या,’ अशी मागणी सुषमा कुमारी हिने व्यक्त केली आहे.
पाटणा- श्रीनगर विमानतळाजवळच्या बीएसएफच्या कॅम्पवर मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवादी आणि लष्करामध्ये झालेल्या चकमकीत साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी.के. यादव शहीद झाले होते, तर बीएसएफचे तीन जवान जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांच्या या कृत्याचा सगळीकडून निषेध केला जातो आहे. शहीद जवान बी.के.यादव यांच्या मुलीनेही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. ‘शंभर दहशतवाद्यांची मुंडकी धडावेगळी करुन वडिलांच्या बलिदानाचा बदला घ्या,’ अशी मागणी सुषमा कुमारी हिने व्यक्त केली आहे. सुषमा कुमारीचे वडील ब्रिज किशोर यादव मंगळवारी श्रीनगरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. ‘माझ्या वडिलांचे बलिदान सार्थ ठरवण्यासाठी १०० दहशतवाद्यांची मुंडकी कापून आणा,’ असं सुषमा कुमारी यांनी म्हटलं आहे.
‘पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, असं आम्हाला वाटतं,’ अशी अपेक्षा सुषमा कुमरी यांनी व्यक्त केली आहे. ‘माझ्या कुटुंबाला आणि बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील कमलचक गावातील सर्वांना वडिलांच्या कामगिरीचा अभिमान वाटतो,’ असंही तिने म्हंटलं आहे. ब्रिज किशोर यादव यांच्यावर बुधवारी संध्याकाळी त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीनगर विमानतळाजवळील सीमा सुरक्षा दलाच्या १८२ व्या बटालियनवर मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांचा मुकाबला करताना लष्करात सहाय्यक निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या ब्रिज किशोर यादव यांना वीरमरण आलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यादव यांच्या कुटुंबीयांना ११ लाखांची मदत जाहीर केली. तर झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी दोन लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.
यादव यांची मुलगी सुषमा कुमारी (वय 18) हिने वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याची मागणी सरकारकडे केली आहे. जोपर्यंत वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला जात नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबतच्या बोलण्याला काहीही अर्थ नसल्याचं सुषमा कुमारी हिने म्हंटलं आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात कडक पाऊलं उचलल्याचं आम्हाला पाहायचं आहे, असं सुषमा कुमारी यांनी म्हंटलं आहे.
नितीश कुमार यांनी व्यक्त केलं दुःख
नितीश कुमार यांनी यादव यांच्या कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. ‘ब्रिज किशोर यादव यांचे बलिदान देशाच्या कायम लक्षात राहिल,’ असं मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. मंगळवारी श्रीनगरमधील बीएसएफच्या बटालियनवर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता. पहाटे ४.३० वाजता हा हल्ला करण्यात आला. यानंतर दुपारपर्यंत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या हल्ल्यात ब्रिज किशोर यादव शहीद झाले. तर तीन जवान जखमी झाले.