नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २०१४ पेक्षा अधिक जागा मिळवल्या. या निवडणुकीत भाजपने एकट्याने बहुमताचा आकडा गाठत ३०० हून अधिक जागांवर विजय मिळवला. तर भाजपप्रणीत एनडीएला ३५० हून अधिक जागा मिळाल्या. मात्र भाजपच्या या विजयावर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात येत आहे.
इव्हीएमविरोधात आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुतांशी ईव्हीएम मशिनमध्ये आपल्याला अनुकूल प्रोग्रामींग करून घेतल्याचा आरोप ममता यांनी केला आहे. तसेच विरोधी पक्षांना इव्हीएमविरुद्ध लढा देण्यासाठी एक टीम बनविण्याचे आवाहन केले आहे. ममता म्हणाल्या की, इव्हीएम घोटाळ्यासंदर्भात आपण काँग्रेसशी चर्चा केली आहे. इव्हीएमविरोधात लढा देण्यासाठी गरज भासल्यास आपण न्यायालयात जावू, असंही ममता यांनी म्हटले.
भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी देशात त्यांना ३०० हून अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. एवढा अचूक अंदाज भाजप नेते कसकाय देऊ शकतात, असा सवाल ममता यांनी उपस्थित केला. तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजपला २३ जागा मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हा अंदाज जवळजवळ अचूक ठरल्याचे ममता यांनी नमूद केले. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होते. यावेळी त्यांनी डाव्या पक्षाच्या समर्थकांनी भाजपमध्ये सामील होऊ नये, असं आवाहन केलं आहे.
या व्यतिरिक्त ममता यांनी दावा केला की, पश्चिम बंगालचे राज्यपाल भाजपच्या प्रवक्त्यांप्रमाणे काम करत आहेत. भाजपने राज्यपालांना सर्वपक्षीय बैठक घेण्यास सांगितले. त्यानंतर राज्यपालांनी बैठक घेतल्याचा दावा देखील ममता यांनी केला.