देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या घरी जाऊन डिनर घेणे, हा सध्या बंगालमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. एकीकडे तृणमूल नेते सौरव गांगुलींवर निशाणा साधत आहेत, तर दुसरीकडे सौरव गांगुली यांनी ही एक साधारण भेट होती, असे म्हटले आहे. या डिनर कार्यक्रमानंतर, सौरव गांगुली यांनी कोलकाता येथील एका कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचेही कौतुक केले.
यावेळी, सौरव गांगुली यांनी ममता बॅनर्जींसोबत आपले जवळचे संबंध असल्याचे म्हटले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या माझ्या अत्यंत जवळच्या आहेत. या संस्थेच्या मदतीसाठी मी त्याच्याशी संपर्क साधला होता. यावेळी गांगुली यांनी कोलकात्याचे महापौर फिरहाद हकीम यांचेही कौतुक केले. तसेच, हकीम यांच्याशी कुणीही कधीही संपर्क साधू शकते, असेही गांगुली म्हणाले.
TMC आमदाराचा गांगुलीवर निशाणा -तत्पूर्वी, हुगळीच्या बालागडमधील टीएमसी आमदार मनोरंजन ब्यापारी यांनी फेसबुकवर, या डिनर कार्यक्रमासंदर्भात सौरव गांगुलींवर टीका केली होती. त्यांनी लिहिले होते, 'सौरव गांगुलीने बंगाली भाषा आणि संस्कृतीचा सर्वाधिक द्वेश करणाऱ्यांपैकी एक असलेल्याचे स्वागत आणि त्यांच्यासोबत भोजन केले. मला अशा लोकांची दया वाटते, जे सौरव गांगुलीला बंगालचा आयकॉन मानतात.'