नवी दिल्ली - पत्नीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशायतून 28 वर्षीय इसमाने आपल्या जवळच्या मित्राची हत्या केली. देवेंदर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपी पवन शुक्लाने देवेंदरची हत्या करुन ड्रग्स सेवनाची सवय सोडवणा-या केंद्रात दाखल झाला होता. पोलिसांना 18 जानेवारीला बदरपूर येथे निर्जन स्थळी देवेंदरचा मृतदेह सापडला. पोलिसांना मृतदेहाजवळ एक फाटलेले व्हिजिटिंग कार्ड सापडले. पोलिसांनी फाटलेल्या व्हिजिटिंग कार्डचे तुकडे एकत्र केल्यानंतर त्यांना त्यावर पवन शुक्लाच्या पत्नीचा फोन नंबर मिळाला.
देवेंदरच्या वडिलांनी पवन शुक्लावर संशय व्यक्त केला होता. पवन हत्या झाली त्या दिवसापासून घरातून बेपत्ता होता. पोलिसांनी त्याचा मोबाईल ट्रॅक केल्यानंतर तो ड्रग्स सेवनाची सोडवणा-या तुघलकाबाद येथील केंद्रात सापडला. चौकशीमध्ये पवनने पोलिसांना सांगितले कि, दीडवर्षांपासून त्याची देवेंदर बरोबर ओळख होती.
ड्रग्स सेवनाची सवय असल्यामुळे दोघांची गट्टी जमली. अनेकदा दोघे गांजा ओढण्यासाठी निर्जन स्थळी जायचे. देवेंदर अनेकदा पवन शुक्लाच्या घरी जायचा. त्यातून देवेंदरची पवनच्या पत्नीबरोबर ओळख झाली. देवेंदरचे आपल्या पत्नीबरोबर प्रेम प्रकरण सुरु असल्याचा पवनचा समज झाला होता. तो देवेंदरवर सतत संशय घेत होता.
18 जानेवारीला दोघांनी ड्रग्स घेतल्यानंतर देवेंदरच्या खिशातून एक व्हिजिटिंग कार्ड पडले. त्या कार्डावर पवनची नजर पडली. त्यावर पवनच्या पत्नीचा फोननंबर लिहिलेला होता. देवेंदर आणि आपल्या पत्नीमध्ये प्रेमसंबंध असल्याचा त्याच्या मनातील संशय अधिक पक्का झाला. त्याने लगेचच देवेंदरच्या हत्येचा कट रचला व त्याला सेवनासाठी अधिक गांजा दिला. देवेंदर नशेमध्ये असताना पवनने त्याच्या डोक्यात दगड घातला व ब्लेडने त्याचा गळा कापला. रक्ताच्या थारोळयात कोसळलेल्या देवेंदरचा जागीच मृत्यू झाला. या हत्येनंतर पवनने ड्रग्स सेवनाची सवय सोडवणा-या केंद्रात प्रवेश घेतला. त्याने पत्नीला चार महिन्यांच्या मुलीसह माहेरी पाठवून दिले होते.