इंदुरमध्ये कोरोनामुळे पतीचं निधन, चीनमधून पत्नीने व्हिडीओ कॉलवरून केला अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 10:14 AM2021-04-21T10:14:44+5:302021-04-21T10:18:12+5:30
मृत व्यक्ती चीनमधील एका बॅंकेत नोकरी करत होता. त्याच्या वडिलांचाही मृत्यू कोरोनामुळे झाला होता. त्यानंतर आईची काळजी घेण्यासाठी तो इथेच थांबला होता.
मध्य प्रदेशातील इंदुरमधून एक मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या व्यक्तीने १२ दिवस कोरोनाशी दोन हात केले. पण अखेर तो जीवनाची लढाई हरला. मृत व्यक्ती चीनमधील एका बॅंकेत नोकरी करत होता. त्याच्या वडिलांचाही मृत्यू कोरोनामुळे झाला होता. त्यानंतर आईची काळजी घेण्यासाठी तो इथेच थांबला होता.
मृत मनोज शर्मा मध्य प्रदेशच्या सिवनी बालाघाटमध्ये राहणारा होता. तो चीनमध्ये शेन झेनमध्ये बॅंकेत नोकरी करत होता. तीन महिन्यांआधीच तो पत्नी आणि मुलांना घेऊन भारतात आला होता. यादरम्यान त्याच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली. त्यात त्यांचं निधन झालं. त्यामुळे आईला सांभाळण्याासाठी मनोज इथेच थांबला. त्याने पत्नी आणि मुलांना चीनला परत पाठवलं.
अशात मनोजलाही कोरोनाही लागण झाली आणि तब्येत जास्त बिघडल्याने त्याला इंदुरच्या अरविंदो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दिवसेंदिवस त्याची स्थिती गंभीर होत गेली. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण १२ दिवसांच्या लढ्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
चीनमध्ये त्याच्या पत्नीला पतीच्या मृत्यूची बातमी दिली गेली. कोरोनामुळे ना मनोजचा मृतदेह चीनला पाठवला जाऊ शकत होता ना पत्नीला अशा स्थितीत इकडे बोलवता येऊ शकत होतं. अशात मनोजच्या पत्नीने पतीच्या एका मित्राला अंत्यसंस्कारासाठी फोन केला.
मृत मनोजच्या मित्राने इंदुरमधील समाजसेवी संस्थांना फोन केला. त्यांचं तरूण समाजसेवक यश प्रेरणा पाराशरसोबत बोलणं झालं. यानंतर मित्र यशने सर्व माहिती प्रशासनाला दिली. मानवता धर्म निभावण्यात पोलीस विभाग आणि प्रशासकीय अधिकारीही मागे सरकले नाहीत. त्यांनी लगेच प्रोटोकॉलनुसार मनोजच्या अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण केली. हजारो किलोमीटर दूर असलेल्या पत्नीने व्हिडीओ कॉलवरून पतीचा अंत्यसंस्कार पाहिला. मनोजला मुखाग्नि समाज सेवक यश प्रेरणा याने दिली.