बरेली- लग्नानंतर सतत हुंड्याची मागणी करणाऱ्या पतीने पत्नीला जिवंत जाळत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. बुधवारी सकाळी उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये ही घटना घडली. 2011मध्ये पीडित महिलेचा लग्न झालं होतं. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिलेचा पती व सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुष्षा कांदपाल (वय 32) असं पीडित महिलेचं नाव असून त्या उत्तराखंडमधील बागेश्वरमधील राहणाऱ्या होत्या. पुष्पा यांचं त्रिभुवन कांदपालशी लग्न झालं. त्रिभुवन उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील मीरपूरचा रहिवाशी आहे. शिक्षक असल्याचं त्रिभुवनने लग्नाच्या वेळी पुष्पाच्या घरच्यांना सांगितलं होतं. पण त्यावेळी तो बेरोजगार होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.'पुष्पाचा पती तिला लग्नानंतर सतत हुंड्यासाठी त्रास देत असल्याचं पुष्पाचा भाऊ बसंत बल्लाहने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुष्पाला जिवंत जाळून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकल्याची माहिती पुष्पाच्या शेजारच्यांनी पोलिसांना व तिच्या कुटुंबियांना दिली. यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी माझोला पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
पुष्पाच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर पुष्पाच्या सासरच्या लोकांनी तिला त्रास द्यायला सुरूवात केली. तिच्याकडे पैशांची मागणी करत तिला शिवीगाळ व मारहाण करायचे. पुष्पाला मुलंबाळ नसल्याने तिच्या सासरचे लोक तिला त्यासाठीही दोष द्यायचे. पण पुष्पाने कधीही याची तक्रार कुणाकडे केली नाही. ती कुठल्या परिस्थितीत राहत होती, याची आम्हाला कल्पना होती.