गुरूग्राम- खरेदीच्या बहाण्याने ट्रायलला मागितलेली हार्ले डेव्हिडसन बाईक एक तरूण घेऊन पळाल्याची घटना गुरुग्राममध्ये घडली आहे. ऑनलाइन सेल-परचेस वेबसाइट ओएलएक्सवर हार्ले डेव्हिडसन गाडीची जाहिरात पाहून एक तरूण ती बाईक विकत घेण्यासाठी सायबर हबला गेला होता. तेथे गाडीची ट्रायल घेण्याच्या बहाण्याने तो तरूण ती गाडी घेऊनच फरार झाला. बराच वेळ होऊनही तो तरूण बाईक घेऊन आला नसल्याने गाडी मालकाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. दरम्यान, सदर पोलीस ठाणे याबद्दचा तपास करत आहे.
अजय असं गाडीमालकाचं नाव असून त्याच्याकडील हार्ले डेव्हिडसन बाईक विकण्यासाठी त्याने ओएलएक्सवर जाहिरात दिली होती. 13 जून रोजी राहुल नागर नावाच्या व्यक्तीने त्याच्याशी संपर्क केला. त्यानंतर सोशल मीडियावर त्या दोघांमध्ये सोशल मीडियावर चॅटिंगही झालं. 15 जून रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सायबर हबमध्ये दोघांनी भेटण्याचं निश्चित केलं. यावेळी राहुल सतत बाईकबद्दल विचारत होता.'मी आगरा येथे राहणारा असून परदेशात मार्बल देण्याचंकाम करतो, असं राहुलने सांगितलं. त्यानंतर दोघंही तेथून निघून गेले. दुपारी दोघांनी पुन्हा एकदा भेटण्याचं फोनवर निश्चित केलं. संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सेक्टर 34मध्ये हार्ले डेव्हिडसनच्या शोरूमममध्ये ते भेटले. अजय तेथे बाईक घेऊन आल्यावर शोरूममधील मॅकेनिककडून त्याने गाडी तपासून घेतली, अशी माहिती पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास दोघंही शोरूममधून निघाले व गाडीचा सौदा त्यांनी केला. 7 लाख रूपयात बाईकचा सौदा करण्यात आला. आरोपी अजयने राहुलला सात हजार रूपये बुकिंगची रक्कम दिली. त्यानंतर राहुलने अजयकडे टेस्ट ड्राइव्हची मागणी केली. सहा वाजता राहुल टेस्ट ड्राइव्हसाठी गेला पण बराच वेळ परतलाच नाही.
अजयने अनेकदा त्याला फोन केला पण राहुलने एकही फोनला उत्तर दिलं नाही व नंतर फोन स्विच ऑफ केला. राहुल गाडी घेऊन पळाल्याचं अजयच्या लक्षात आल्यावर त्याने सात वाजता पोलीस कंट्रोल रूममध्ये फोन करून सूचना दिली. 15 तारखेला तो तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेला पण पोलिसांनी ईद असल्याचं सांगत त्याला परत पाठवलं. त्यानंतर अजय तेथून निघून गेला व त्याने ऑनलाईन तक्रार दाखल केली.