चंदीगड - हिमाचल प्रदेशचे परिवहन मंत्री गोविंद ठाकूर यांच्या पत्नीची दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. गोविंद ठाकूर यांच्या पत्नी रजनी ठाकूर यांच्या बॅगेतील अडीच लाख रुपयांची रोख रक्कम आणि दागिने चोरांनी लंपास केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री गोविंद ठाकूर यांच्या पत्नी रजनी चंदीगडच्या सेक्टर-8 मार्केटमध्ये शॉपिंगसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा ड्रायव्हर गाडीतच बसला होता. चोरांनी ड्रायव्हरला तुमचे पैसे खाली पडले आहेत असं खोटं सांगितलं. गाडीबाहेर तुमच्या काही नोटा पडल्या आहेत असं सांगितल्यावर ड्रायव्हर गाडीबाहेर आला आणि याचाच फायदा घेत चोरांनी वस्तू आणि रक्कम लंपास केली आहे.
गाडीमध्ये रजनी ठाकूर यांची बॅग होती. या बॅगेमध्ये तब्बल अडीच लाख रोख रक्कम आणि काही दागिने होते. चोरांनी ड्रायव्हरला फसवून ही बॅग लंपास केली. रजनी ठाकूर यांनी या घटनेनंतर तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ड्रायव्हरची अधिक चौकशी केली असता त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. जैन यांच्या स्वयंपाक घरातील आणि बाथरुममधील नळ तसेच शोभेच्या वस्तूही चोरांनी लंपास केल्या. सत्येंद्र यांनी रविवारी (22 सप्टेंबर) ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. आरोग्यमंत्री जैन यांनी चोरीच्या घटनेनंतर आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट केलं होतं. यामध्ये दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात असणाऱ्या त्यांच्या घराचे काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोमध्ये घरातील सामान अस्थावस्थ पडलेले दिसले. दिल्लीतील चोरांना पोलिसांची भीती राहिलेली नाही असं ही त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं होतं.