...तर आम्हाला भाजपासोबतची आघाडी तोडावी लागेल; मित्रपक्षाने का दिला सूचक इशारा?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 04:11 PM2023-06-17T16:11:06+5:302023-06-17T16:11:42+5:30

सरकारने संवेदनशील क्षेत्रावर लक्ष द्यावे नाहीतर आम्हाला सरकारसोबत राहायचे की विरोधी पक्षासोबत जायचे यावर विचार करावा लागेल

Manipur Violence: 'Will have to reconsider alliance with BJP': NPP vice-president Joykumar Singh | ...तर आम्हाला भाजपासोबतची आघाडी तोडावी लागेल; मित्रपक्षाने का दिला सूचक इशारा?

...तर आम्हाला भाजपासोबतची आघाडी तोडावी लागेल; मित्रपक्षाने का दिला सूचक इशारा?

googlenewsNext

नवी दिल्ली - मणिपूरमध्ये गेल्या दिड महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. याठिकाणी अथक प्रयत्नानंतरही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले नाही. त्याचवेळी नॅशनल पीपुल्स पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वाई जॉयकुमार सिंह यांनी मोठे विधान केले आहे. जर आगामी काळात परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर भाजपासोबतच्या आघाडीवर आम्हाला फेरविचार करावा लागेल. आम्ही गप्प बसून हे पाहू शकत नाही असं त्यांनी म्हटलं. 

जॉयकुमार सिंह म्हणाले की, मणिपूरमध्ये कलम ३५५ लागू आहे. त्यामुळे येथील लोकांची सुरक्षा करणे राज्य आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे. परंतु हिंसा रोखण्यासाठी कुठलीही योजना बनवली जात नाही. सध्या परिस्थिती सुधारेल अशी चिन्हे नाहीत. राज्यातील सुरक्षा व्यवस्था बिघडली आहे. केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह यांच्या घरावर जमावाने हल्ला केला. त्यांच्या घरावर बॉम्ब फेकले. आज आर के रंजन यांना निशाणा बनवले. उद्या सर्व आमदार, भाजपा मंत्री आणि सहकारी पक्षालाही टार्गेट केले जाऊ शकते अशी भीती त्यांनी वर्तवली. 

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतरही परिस्थितीत बदल झाला नाही. मणिपूरमध्ये कुणाचे नियंत्रण आहे केंद्राचे की राज्याचे हा प्रश्न लोक विचारत आहेत. राज्यात संभ्रम आहे. कोण प्रभारी आहे हे स्पष्ट व्हायला हवे अन्यथा स्थिती जैसे थे राहील. आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देत काय पाऊले उचलायला हवीत ते सांगितले आहे. सुरुवातीलाच हे प्रकरण हाताळायला हवे होते. योग्य योजना बनवा. सरकारने संवेदनशील क्षेत्रावर लक्ष द्यावे नाहीतर आम्हाला सरकारसोबत राहायचे की विरोधी पक्षासोबत जायचे यावर विचार करावा लागेल असं NPP चे उपाध्यक्ष जॉयकुमार सिंह यांनी सूचक इशारा दिला. 

हिंसेत आतापर्यंत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू
मणिपूरमध्ये एक महिन्यापूर्वी मैतेई आणि कुकी समुदायात वाद उफाळून आला आणि त्यातून हिंसा भडकली. या जातीय हिंसाचारात आतापर्यंत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याठिकाणी मैतेई समुदाय अनुसूचित जातीचा(ST) दर्जा देण्याची मागणी करत आहे. तर त्याविरोधात डोंगराळ भागात आदिवासी एकजुट मोर्चा काढला जात आहे. मणिपूरमध्ये मैतेई समाजाची लोकसंख्या ५३ टक्के आहे आणि बहुतांश इंफाल खोऱ्यात ते राहतात. आदिवासी नागा आणि कुकी समुदायाची लोकसंख्या ४० टक्के आहे जे पहाडी जिल्ह्यात राहतात. राज्य सरकारने चुकीच्या अफवा रोखण्यासाठी ११ जिल्ह्यात कर्फ्यू लावला आहे. त्याचसोबत इंटरनेट सेवाही खंडीत केली आहे. 

Web Title: Manipur Violence: 'Will have to reconsider alliance with BJP': NPP vice-president Joykumar Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.