लखनऊ : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. मनीष सिसोदिया उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जर उत्तर प्रदेशच्या लोकांनी आम आदमी पार्टीला (आप) मतदान केले तर आप सरकारकडून स्थापनेच्या 24 तासांच्या आत घरगुती वीज मोफत दिली जाईल, ज्याप्रमाणे दिल्लीतील केजरीवाल सरकारने केले आहे, असे मनीष सिसोदिया यांनी सांगितले. (manish sisodia promises free electricity to uttar pradesh if aap comes to power)
घरगुती वापरासाठी 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा करताना मनीष सिसोदिया म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारच्या कार्यकाळात लोक महागड्या वीज बिलांमुळे त्रस्त आहेत आणि विशेषतः शेतकरी खुश नाहीत, त्यांना महाग वीज मिळत आहे. त्यामुळे तुमचे मत ही समस्या सोडवू शकते. तुम्ही आम्हाला मत दिल्यास ही समस्या सुटेल.
आम आदमी पार्टी सत्तेवर आल्यास राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी कोणतेही वीज शुल्क भरावे लागणार नाही, असेही मनीष सिसोदिया म्हणाले. तसेच, कितीही विजेची गरज असली तरी शेतकऱ्यांचे वीज बिल शून्यावर येईल. उत्तर प्रदेशात ५ ते १० हजार कमवणाऱ्या लोकांची बिल लाखोंच्या घरात येत आहे. त्यामुळे लोक आत्महत्या करत आहेत, असे शेकडो लोक आहेत, ज्यांना अशाप्रकारे त्रास होत आहे, अले मनीष सिसोदिया यांनी सांगितले.
याचबरोबर, एक व्हिडिओ जारी करताना मनीष सिसोदिया यांनी आपले संपूर्ण म्हणणे मांडले. उत्तर प्रदेशातील अनेक प्रकरणांचा हवाला देत, वीज बिलांमुळे लोक कसे आत्महत्या करत आहेत, ते सांगितले. तसेच, केवळ वीज बिलांची समस्याच नाही तर दिल्लीतील वीज कपातीची समस्याही दूर झाली आहे. उत्तर प्रदेशातही केजरीवाल सरकारचा हाच पराक्रम आम आदमी पार्टी करून दाखवेल, असे मनीष सिसोदिया म्हणाले.
केजरीवाल तिसऱ्यांदा ‘आप’चे राष्ट्रीय संयोजकगेल्या शनिवारी आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने ३४ सदस्यांनी नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय संयोजकपदी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सलग तिसऱ्यांदा निवड करण्यात आली. पंकज गुप्ता आणि एन. डी. गुप्ता यांची अनुक्रमे सचिव आणि कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पाच वर्षांसाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.