- लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राज्यात बीफची कमतरता जाणवू नये, म्हणून कर्नाटकातून बीफ आणण्याचा पर्याय राज्य सरकारपुढे आहे, असे विधान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केल्यामुळे विश्व हिंदू परिषदेने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मनोहर पर्रीकर यांच्या या विधानामुळे भाजपाची प्रतिमा मलिन झाली आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे नेते सुरेंद्र जैन यांनी म्हटले आहे. भाजप हा बीफ जॉय पार्टी झाला आहे का, असा सवाल करून जैन यांनी म्हटले आहे की, आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी पर्रीकर यांचा राजीनामा घेणे, हाच मार्ग भाजपापुढे शिल्लक आहे. पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना, राज्यात बीफची कमतरता भासू नये, यासाठी कर्नाटकातून बीफ आणण्याचा पर्याय आम्ही बंद केलेला नाही, असे म्हटले होते. भाजपाचे आमदार नीलेश काब्राल यांनीच संबंधित प्रश्न विचारला होता. गोवा मांस प्रकल्पातून दोन क्विंटल बीफ पुरवले जाते. उर्वरित गरज कर्नाटकातून येणाऱ्या मासांतून भागवली जाते. गोवा मीट कॉम्प्लेक्समध्ये शेजारील राज्यातून कत्तलींसाठी येणाऱ्या जनावरांवर बंदी आणण्याचा सरकारचा हेतू नाही. राज्यात येणारे पर्यटक व येथील अल्पसंख्यांक समूह बीफचे सेवन करतात. त्यांचे प्रमाण राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ३0 टक्के आहे. गोव्यात अन्य राज्यांतून येणाऱ्या बीफची तपासणी करण्यात येणार असल्याचेही पर्रीकर यांनी सांगितले. राज्यात रोज २.३ ते २.४ क्विंटल बीफची विक्री होत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मनोहर पर्रीकर यांनी राजीनामा द्यावा, विहिंपची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 2:16 AM