राम मंदिर ट्रस्टच्या नावावर अनेकांची फसवणूक,QR कोडद्वारे देणगी मागितली; विश्व हिंदू परिषदेची यूपी पोलिसांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 12:53 PM2024-01-01T12:53:44+5:302024-01-01T12:54:52+5:30
अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे.
उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. यातच आता फसवणुकीच्या काही घटना समोर आल्या आहेत, राम मंदिर ट्रस्टच्या नावावर QR कोडच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार विश्व हिंदू परिषदेने उत्तर प्रदेश पोलिसांत केली आहे.
विश्व हिंदू परिषदेने सांगितले की, काही लोक अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या नावावर कोणतीही मान्यता न घेता पैसे मागत आहेत. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. लोकांना क्यूआर कोड पाठवून फसवणूक केली जात असल्याचेही तक्रारीत समोर आले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी लोकांना मंदिर ट्रस्टच्या नावावर फसवणूक करण्याचा प्रयत्न करणार्यांच्या जाळ्यात न येण्याचे आवाहन केले. त्यांनी यूपी पोलीस प्रमुखांना पाठवलेली तक्रारही शेअर केली. बन्सल यांनी दुसर्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही उत्तर प्रदेश डीजीपी, लखनौ रेंज आयजी यांना आस्थाच्या प्रकरणात त्वरित कारवाई करण्यासाठी औपचारिक तक्रार पाठवली आहे. त्यांनी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र नावाने तयार केलेले फेसबुक पेज शेअर केले आहे. यामध्ये क्यूआर कोडद्वारे देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विनोद बन्सल म्हणाले की, काही लोक टेम्पल ट्रस्टच्या नावाने बनावट आयडी बनवून पैशांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच विश्व हिंदू परिषदेने म्हटले होते की, अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्यासाठी कोणालाही स्वतंत्र समिती स्थापन करण्याची आणि पैसे गोळा करण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत समाजानेही सतर्क राहणे गरजेचे असल्याचे संघटनेचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी सांगितले होते.