नवी दिल्ली : ‘अभिजात’पणाचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा, असे ठोस प्रतिपादन डॉ. नरेंद्र जाधव यांनी राज्यसभेत केले. मराठी भाषा संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचा दावा जाधव यांनी केला.
अभिजात भाषेच्या निकषांविषयी ते म्हणाले, भाषा प्राचीन असावी, भाषेचे वय दीड ते दोन हजार वर्षांचे असावे, भाषेचे स्वयंभूपण कायम असावे, साहित्यसंपदा श्रेष्ठ व संपन्न असावी, प्राचीन व आधुनिक रूपात भाषेचा गाभा कायम असावा, या साऱ्या निकषांवर मराठी बसते. मराठीतील पहिला शिलालेख २२२० वर्षांपूर्वी ब्राह्मी लिपीत आहे.
तामिळ भाषेतील संघम साहित्यात मराठीचा उल्लेख आढळतो त्यामुळे मराठी भाषा संस्कृतपेक्षाही प्राचीन असल्याचे सिद्ध होते. दोन हजार वर्षांपूर्वीच्या गाथा सप्तशती ग्रंथाचा संदर्भ देत जाधव म्हणाले की, चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्यापासून ते आधुनिक काळातील वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, पु.ल. देशपांडे, भालचंद्र नेमाडे, नामदेव ढसाळांपर्यंत मराठीला श्रेष्ठ साहित्याची परंपरा आहे. मराठी भाषा अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करते.