वधू-वराच्या अनुपस्थितीतही विवाह नोंदणी करता येणार; केरळ उच्च न्यायालयाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 07:54 AM2021-09-07T07:54:22+5:302021-09-07T07:54:55+5:30
Marriage registration: विशेष विवाह अधिनियम नुसार एका प्रकरणाच्या सुनावणीवर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.
वधू-वर उपस्थित नसतानाही लग्नाची नोंदणी करता येणार आहे. केरळ उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. विशेष विवाह अधिनियम नुसार एका प्रकरणाच्या सुनावणीवर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षांची ओळख पटविणे हे एक आव्हान होते, मात्र आता पर्याय म्हणून फेसिअल रेकग्निशन आणि बायोमेट्रीक सारखे तंत्रज्ञान वापरून लग्न नोंदणी करता येणार आहे.
जस्टिस महम्मद मुश्ताक आणि कौसर एडप्पागठ यांच्या पीठाने केंद्र सरकारच्या अधिवक्त्यांना या संबंधी पक्षकारांची ओळख पटविण्यासाठी फेसिअल रेकग्निशन व अन्य तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी केंद्राकडून नितीगत निर्देश देण्यात यावेत असे म्हटले आहे.
खंडपीठाने एकल पीठाचे न्यायाधीश पीबी सुरेश कुमार यांच्या निर्णयावर सहमती दर्शविली. वधू-वर उपस्थित नसताना त्यांचा विवाह नोंद करता येऊ शकतो, हे सांगण्यास आता काही हरकत नाही. मात्र, नोंदणी अधिकाऱ्याला या दोघांची ओळख पटविता आली पाहिजे. ऑनलाईनद्वारे ही ओळख पटविण्याच्या प्रक्रियेवर याबाबत विचार केला जावा, असे न्यायमूर्ती म्हणाले.
याचा फायदा कोणाला...
एकल पीठाच्या सुनावणीवेळी सरकारचे म्हणणे होते की, विवाह नोंदणी करण्यासाठी वर-वधू यांची उपस्थिती विवाह नोंदणी अधिकाऱ्यासमोर असणे गरजेचे आहे. तसेच कोणताही एक पक्ष विवाह नोंदणी कार्यालयातील क्षेत्रीय निवासी असायला हवा. यामुळे परदेशात राहणाऱ्या लोकांचा विवाह नोंद केला जाऊ शकत नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार अंमलबजावणी झाल्यास याचा फायदा दुसऱ्या शहरांमध्ये किंवा देशांमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना होणार आहे.