सप्तपदीविना हिंदूंचा विवाह वैधच

By Admin | Published: November 12, 2015 12:12 AM2015-11-12T00:12:50+5:302015-11-12T00:12:50+5:30

सप्तपदी आणि मंगळसूत्रबंधन याविना हिंदूचे ‘स्वयंमर्यादा’ विवाह लावण्यासाठी तामिळनाडू सरकारने सुमारे ५० वर्षांपूर्वी केलेला कायदा घटनात्मक वैध असल्याचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.

Marriage of Hindus without Saptapada is valid | सप्तपदीविना हिंदूंचा विवाह वैधच

सप्तपदीविना हिंदूंचा विवाह वैधच

googlenewsNext

चेन्नई : भटजीचे मंत्रपठण, लाजाहोम, सप्तपदी आणि मंगळसूत्रबंधन याविना हिंदूचे ‘स्वयंमर्यादा’ (आत्मसन्मान) विवाह लावण्यासाठी तामिळनाडू सरकारने सुमारे ५० वर्षांपूर्वी केलेला कायदा घटनात्मक वैध असल्याचा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.
तामिळनाडू सरकारने हिंदू विवाह कायद्यात ७ ए हे नवे कलम अंतर्भूत करून ‘स्वयंमर्यादा’ या सरळ, सोप्या पद्धतीने विवाह करण्याची सोय केली. या कायद्याच्या वैधतेस आव्हान देणारी अ‍ॅड. ए. असुवथमन यांनी केलेली जनहित याचिका फेटाळताना मुख्य न्यायाधीश न्या. संजय किशन कौल व न्या. टी. एस. शिवाग्ननन यांच्या खंडपीठाने म्हटले की, ‘मुळात हिंदू धर्म विविधांगी असून त्यात त्या त्या प्रदेशानुसार व रीतिभातींप्रमाणे विवाह करण्याच्या अनेक पद्धती परंपरेने रूढ झालेल्या आहेत. तामिळनाडू सरकारने कायदा दुरुस्ती करून अशाच एका सोप्या पद्धतीने विवाह करण्याची सोय हिंदूंना करून दिली आहे. शिवाय राज्यात ‘स्वयंमर्यादा’ पद्धतीने लावलेले विवाह गेली पाच दशके काळाच्या कसोटीवर उतरले आहेत, असेही खंडपीठाने नमूद केले.
या कायद्याच्या वैधतेस आव्हान देताना कायदेशीर मुद्द्यांखेरीज याचिकाकर्त्यांचा असाही आक्षेप होता की, एका ठराविक राजकीय चळवळीची विचारसरणी पुढे रेटण्यासाठी हा कायदा केला गेला आहे. पण यावर टीका करताना न्यायालयाने म्हटले की, जणू काही देशात सध्या फूटपाडू मुद्द्यांची वानवा आहे म्हणून या याचिकेने असाच एक मुद्दा समोर आणण्याचा हेतू साध्य केला आहे. देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने गृहस्थाश्रम स्वीकारणे हे हिंदू विवाह पद्धतीमधील पारंपरिक धार्मिक विधी आहेत. तामिळनाडू सरकारच्या कायद्याने या विधींना फाटा दिल्याने तो घटनाबाह्य ठरवावा, असा अ‍ॅड. असुवथमन यांचा आग्रह होता; परंतु न्यायालयाने म्हटले की, व्यक्तिगत कायद्याशी संबंधित अशा बाबींमध्ये विवाह करण्याच्या पद्धतीत दिले गेलेले पर्याय राज्यघटनेनुसार कसे निषिद्ध ठरतात हे याचिकाकर्त्यांनी दाखविलेले नाही. विधिमंडळाने केलेला कायदा वैधच असतो. ते खोडून काढण्यासारखे याचिकेत आम्हाला काही दिसत नाही.
न्यायालयाने म्हटले की, वैध हिंदू विवाहासाठी पुरोहिताच्या साक्षीनेच करण्याची गरज नाही, हा या कायदा दुरुस्तीचा मुख्य गाभा आहे. वधू-वरांच्या नातेवाईकांची व मित्रमंडळींची विवाहास उपस्थिती असणे पुरेसे आहे. दोघांनीही पती/पत्नी म्हणून परस्परांचा स्वीकार केल्याचे सुस्पष्ट शब्दांत उच्चारण करणे व त्यानंतर त्यांनी एकमेकांना हार घालणे किंवा एक दुसऱ्याच्या कोणत्याही बोटात अंगठी घालणे या गोष्टी पुरेशा आहेत.
हिंदू वैदिक संस्कृतीचे जोखड झुगारून देण्यासाठी ईव्हीआर पेरियार यांनी १९२५ मध्ये तामिळनाडूत प्रखर द्राविडी चळवळ उभारली. याच चळवळीतून द्रविड मुन्नेत्र कझगम हा राजकीय पक्ष उदयाला आला व १९६७ मध्ये सी. एन. अण्णादुराई या पक्षाचे पहिले मुख्यमंत्री झाले. अण्णादुराई यांनी सत्तेवर येताच पहिला निर्णय ‘स्वयंमर्यादा’ विवाहांचा घेतला व त्याच्या पुढच्याच वर्षी अशा विवाहांना वैधानिक अधिष्ठान देणारा कायदा केला गेला.

Web Title: Marriage of Hindus without Saptapada is valid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.