सांबा - घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला की कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. मात्र अशा कठीण प्रसंगात हार न मानता आपल्या कुटुंबियांसाठी तसेच दोन वर्षाच्या मुलीसाठी एका वीर जवानाची पत्नी लेफ्टनंट झाली आहेत. जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात राहणाऱ्या नीरू संब्याल यांचे पती शहीद झाले होते. पतीच्या मृत्यूनंतर न थांबता नीरू या पतीच्या जागी लष्करामध्ये लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत.
भारतीय सैन्यातील जवान रवींद्र संब्याल हे 2015 मध्ये एका चकमकीत शहीद झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी नीरू संब्याल यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली. आपल्या पतीचे देशसेवेचे कार्य पुढे चालू राहावे यासाठी जिद्दीने उभं राहत, कुटुंबाला सांभाळत नीरू या लेफ्टनंट झाल्या आहेत.
पतीच्या मृत्यूनंतर मी निराश झाले होते. पण माझी दोन वर्षाची मुलगीच माझ्यासाठी प्रेरणा झाल्याचं नीरु यांनी माध्यमांना सांगितलं. तसेच मुलीसमोर आदर्श निर्माण करण्यासाठी मी सैन्यात रुजू होण्याचा निर्णय घेतला आणि आज मी लेफ्टनंट आहे. सैन्यात काम करण्यासाठी मानसिकदृष्ट्या कणखर असणं अतिशय महत्त्वाचं असल्याचं नीरू यांनी सांगितलं.