डेहराडून- डेहराडून येथील शिशिर मल्ल यांना देशासाठी लढताना वीरमरण आलं. पतीच्या निधनानंतर खचून न जाता त्यांनी धीराने लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. संगीता मल्ल असं शहीद शिशिर मल्ल यांच्या पत्नीचं नाव असून त्या आता सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू होणार आहेत. संगीता मल्ल यांनी बँक आणि सैन्य अशा दोन्ही परीक्षा दिल्या होत्या. दोन्ही परीक्षेत त्या उत्तीर्णही झाल्या. पण तरीही संगीता यांनी बँकेची नोकरी न स्वीकारता लष्करात जाण्याचा निर्णय घेतला.
संगीता मल्ल यांचे वडीलही सैन्यात होते. त्यांचे सासरे सुरेश मल्ला ऑनररी कॅप्टन होते. पती शिशिर मल्ल रायफलमॅन होते. २०१५ मध्ये २१ मार्चला संगीताचे सासरे सुरेश मल्ल यांचं निधन झालं. त्यानंतर 6 महिन्यांतच २ सप्टेंबरला जम्मू-काश्मीरमध्ये बारामुल्ला क्षेत्रात 'ऑपरेशन रक्षक' सुरू असताना शिशिर मल्ल शहीद झाले. शिशिरची या ऑपरेशनदरम्यानची कामगिरी पाहून सरकारने त्यांना मरणोत्तर सेवा पदकही दिलं आहे. घरातील सगळेच वडील व मुलाच्या जाण्याने दुःखात होते. संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण या परिस्थितीतून स्वतःव परिवाराला सावरण्याचा निर्धान संगीता मल्ल यांनी केला.
सासूला सावरण्यासाठी संगीता मल्ल आधी स्वतः दु:खातून बाहेर पडल्या. पोस्टग्रॅज्युएट असणाऱ्या संगीता यांना त्यांच्या वडिलांनी सैन्यात दाखल होण्यासाठी प्रोत्साहित केलं. सासूनेही त्यांना पाठिंबा दिला. संगीता यांनी आधी शिक्षिका म्हणून काम केलं होतं. शिक्षिकेच्या कामाचा अनुभव असणाऱ्या संगीता यांनी बँक आणि सैन्य या दोन्ही विभागांच्या परीक्षा दिल्या. विशेष म्हणजे या दोन्ही परीक्षांमध्ये त्यांची निवड झाली. देशातल्या एका मोठ्या बँकेच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नईसाठी त्यांची निवड झाली होती, पण संगीता यांनी लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला.