नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या विमानांनी बालाकोट येथे दहशतवादी तळांवरच हल्ले चढविले होते, अशी कबुली जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याचा भाऊ मौलाना अम्मार याने एका ध्वनिफितीत दिली आहे.अम्मारने म्हटले आहे की, जैश-ए-मोहम्मदच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या या तळांवर दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असे. भारतीय लढाऊ विमानांच्या हल्ल्यामुळे या तळांचे मोठे नुकसान झाले आहे. अम्मारची ही ध्वनिफीत पाकिस्तानमध्ये बातमीदारी करणाऱ्या एका पत्रकाराने टिष्ट्वटरवर झळकवली आहे. त्या ध्वनिफितीच्या सत्यतेला भारतीय गुप्तचर संस्थांनीही दुजोरा दिला आहे.बालाकोटच्या हल्ल्यानंतर दोन दिवसांनी ही ध्वनिफीत बनविण्यात आली असावी, असा गुप्तचर संस्थांचा कयास आहे. भारताने केलेल्या हल्ल्याबाबत अम्मारने म्हटले आहे की, शत्रूने इस्लामी देशाविरुद्ध युद्ध पुकारले आहे.सीमा ओलांडून शत्रूने इस्लामी शाळांवर बॉम्बफेक केली. आता शत्रूविरोधात हत्यार उचलण्याची, त्यांच्याविरोधात जिहाद करण्याची वेळ आली आहे. ही ध्वनिफीत पेशावरमधील मदरसा सनान बिन सलमा येथे दहशतवाद्यांना ऐकविण्यात आली.>दहशतवाद्यांना मोठा दणकायासंदर्भात भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले की, भारतीय हवाई दलाने परिमाणकारक हल्ले चढविले त्याचे पडसादच या ध्वनिफितीच्या रूपाने ऐकू येत आहेत. या हल्ल्यांचा जैश-ए-मोहम्मदला मोठा दणका बसला असून, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाकडून दहशतवाद्यांना या ध्वनिफितीच्या रूपाने संदेश देण्यात आला आहे.भारताने दहशतवाद्यांवर हल्ले चढविताना पाकिस्तानातील नागरी वस्त्यांना लक्ष्य केले नाही. हा हल्लाच इतका जोरदार होता की, त्याचा अपेक्षित तो परिणाम साधला गेला आहे. त्यानंतर पाकिस्तानातील अनेकांची भाषा बदलली आहे.
जैशच्या दहशतवादी तळांवरच भारताकडून हल्ले, मसूद अजहरच्या भावाची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 4:54 AM