नवी दिल्ली : प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य फार महत्त्वाचे आहे. टीका करण्याचा अधिकारही त्यांना आहे. त्याचवेळी चांगल्या कामांना जागाही मिळाली पाहिजे, असे मत केंद्रीय युवक कामकाज व सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले.अनुराग ठाकूर यांनी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या येथे झालेल्या भेटीत हे मत व्यक्त केले. विस्तृतपणे आपले विचार व्यक्त करताना ठाकूर यांनी ‘लोकमत’ नागपूर आवृत्ती सुवर्ण जयंती वर्ष साजरे करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “स्वातंत्र्यलढ्यापासून ते सामान्य माणसाच्या हिताच्या लढाईने ‘लोकमत’ला क्रमांक एकचे स्थान दिले आहे. ‘लोकमत’च्या सुवर्ण जयंती वर्ष कार्यक्रमाला मी आवर्जून येईन.”यावेळी झालेल्या चर्चेत अनुराग ठाकूर म्हणाले की, “माहिती व प्रसारण मंत्री म्हणून जबाबदारी देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पष्टपणे मला म्हणाले की, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य फार महत्त्वाचे आहे. मीदेखील असेच मानतो.” आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा करत आहोत. माझे पत्रकारितेशी खूप जवळून नाते राहिले आहे. जेव्हा मी क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचा अध्यक्ष होतो, तेव्हा पत्रकारांशी संबंध होता. हिंदुस्थानची पत्रकारिता खूप जबाबदार आणि सशक्त आहे, असा माझा अनुभव आहे, असे ठाकूर म्हणाले. ठाकूर म्हणाले, “देशाला मोठे बनविण्याची जबाबदारी ही फक्त सरकारची नाही तर सामान्य माणसाचीही आहे. मला खात्री आहे की, या निकषांवर आमची पत्रकारिता नेहमीच उत्तीर्ण होत राहील.”
प्रसार माध्यमांनी चांगल्या कामालाही जागा द्यावी -अनुराग ठाकूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 6:24 AM