नवी दिल्ली - मेघालय निवडणुकीपूर्वी मंगळवारी (30 जानेवारी) काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी शिलाँग येथे दाखल झाले होते. यावेळी तब्बल 70 हजार रुपयांच्या किंमतीचं जॅकेट परिधान करुन राहुल गांधी पार्टीच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी उत्तराखंडातील निवडणूक प्रचारादरम्यान एक सभेमध्ये कुर्त्यांचा फाटलेले खिसा दाखवणा-या राहुल गांधी यांनी आता एवढं महागडं जॅकेट घातल्यानं भाजपानं त्यांच्यावर चौफेर टीकास्त्र सोडले आहे.
महागड्या जॅकेटवरुन भाजपानं राहुल गांधींवर ट्विटरवरुन निशाणा साधला आहे. 'राहुल यांचं सुटा-बुटातील मेघालय सरकार भ्रष्टाचाराच्या आहारी गेले आहे. आमच्याकडे उत्तर मागण्याऐवजी काँग्रेस सरकारनं स्वतःचं रिपोर्ट कार्ड दिलं पाहिजे', असे ट्विट भाजपानं मंगळवारी केले आहे.
ट्विटमध्ये भाजपाकडून जॅकेटची किंमतीदेखील पोस्ट करण्यात आली आहे. हे जॅकेट ब्रिटिश लक्जरी फॅशन ब्रँड बरबरी कंपनीचे आहे. ब्लूमिंगडेल्सच्या वेबसाइटच्या मते, या जॅकेटची किंमत ही 68, 145 रूपये एवढी आहे. राहुल गांधी यांनी यापूर्वी भाजपावर सुटा-बुटाचे सरकार असा आरोप केला होता. यावरुनच भाजपानं राहुल गांधींवर हल्लाबोल चढवला आहे.
वर्ष 2015 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आपले नाव असलेला सूट परिधान केला होता. त्यानंतर राहुल गांधींनी त्यांच्यावर टीका केली होती. या सूटला लिलावात 4 कोटी 31 लाख रूपये मिळाले होते.
दरम्यान, शिलाँग येथे आयोजित कार्यक्रमाचा राहुल गांधींनी कार्यक्रमात 4 हजार लोकांसहीत आनंद घेतला. मागील 15 वर्षांपासून काँग्रेसची येथे सत्ता आहे. मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान आहे.