नवी दिल्ली- माल वाहतूकदारांनी गेल्या काही दिवसांपासून पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. माल वाहतूकदारांच्या शिखर संघटनेच्या शिष्टमंडळासोबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. थोड्याच वेळात दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन वाहतूकदार संप मागे घेण्याची घोषणा करतील. तब्बल आठ दिवसांनी देशभरातील माल वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. इंधनाचे दर कमी करून देशभरातील डिझेल दर समान करावेत, देशात टोलमुक्ती करावी, थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम कमी करावा, जड वाहनांना दोन चालकांची सक्ती करू नये, सर्व प्रकारच्या बस आणि पर्यटक वाहनांना राष्ट्रीय वाहतूक परवाना मिळावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. माल वाहतूकदार शिष्टमंडळाची अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्याशी बुधवारी भेट झाली होती.त्याच वेळी गोयल यांनी माल वाहतूकदार आणि सरकारी प्रतिनिधींची समिती नेमून मागण्यांवर निर्णय घेईल, असा प्रस्ताव मांडला. परंतु माल वाहतूकदारांना तो प्रस्ताव मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. अखेर आज पुन्हा पीयूष गोयल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.
आठ दिवसांपासून सुरू असलेला माल वाहतूकदारांचा संप अखेर मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 8:32 PM