रेल्वे रद्द झाल्यास मिळणार मेसेज
By admin | Published: June 26, 2015 11:44 PM2015-06-26T23:44:20+5:302015-06-26T23:44:20+5:30
आरक्षण करण्यात आलेली रेल्वे ऐनवेळी रद्द झाल्यास संबंधित प्रवाशाला आता त्याच्या मोबाईल क्रमांकावर यासंदर्भातील संदेश मिळणार आहे.
नवी दिल्ली : आरक्षण करण्यात आलेली रेल्वे ऐनवेळी रद्द झाल्यास संबंधित प्रवाशाला आता त्याच्या मोबाईल क्रमांकावर यासंदर्भातील संदेश मिळणार आहे. मात्र, ही सुविधा सुरुवातीला रेल्वे जिथून सुटणार आहे, तेथील प्रवाशांना मिळेल. रेल्वेने प्रवाशांच्या गैरसुविधा दूर करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरू केला आहे.
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही प्रवाशांच्या हितासाठी लघुसंदेश अर्थात एसएमएस सेवा सुरू केली आहे. आरक्षित रेल्वे ऐनवेळी रद्द झाल्यास यासंदर्भातील लघुसंदेश संबंधित प्रवाशाच्या मोबाईलवर पाठविला जाईल. सध्या केवळ रेल्वे सुटणार असलेल्या ठिकाणी चढणाऱ्या आरक्षित प्रवाशांनाच लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे. येत्या काळात या सेवेचा विस्तार करण्यात येणार असून मार्गातील सर्व स्थानकांचा यात समावेश केला जाईल. आरक्षणावेळी नोंदविण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेश पाठविण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी आरक्षण अर्जावर आपला मोबाईल क्रमांक अवश्य नोंदवावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)