#MeToo: लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात अकबर उतरवणार 97 वकिलांची फौज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 09:29 AM2018-10-16T09:29:18+5:302018-10-16T09:30:47+5:30
अकबर यांच्याकडून महिलेविरोधात मानहानीचा दावा
नवी दिल्ली: केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या महिला पत्रकाराविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. विशेष म्हणजे स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी अकबर तब्बल 97 वकिलांची फौज न्यायालयात उभी करणार आहेत. अकबर यांचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी करांजवाला अँड कंपनी ही लॉ फॉर्म मैदानात उतरणार आहे. मात्र या 97 वकिलांपैकी केवळ 6 वकिलच प्रत्यक्ष न्यायालयात अकबर यांची बाजू मांडतील, असं करांजवाला अँड कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
एम. जे. अकबर यांच्याविरोधात सर्वप्रथम प्रिया रमानी यांनी आवाज उठवला. अकबर यांनी एका हॉटेलमध्ये बोलावून आपल्यासोबत गैरवर्तन केल्याची तक्रार रमानी यांनी केली. यानंतर आतापर्यंत तब्बल 10 महिलांनी अकबर यांनी केलेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. या सर्व महिलांविरोधात कायदेशीर संघर्ष करण्याचा निर्णय अकबर यांनी केला आहे. आपल्यावरील सर्व आरोप तथ्यहीन असल्याचं अकबर यांनी म्हटलं आहे. रविवारी अकबर आफ्रिकेहून भारतात परतले. यानंतर सोमवारी त्यांच्या वकिलांनी प्रिया रमानी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला.
एम. जे. अकबर संपादक पदावर असताना त्यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप 10 महिलांनी केला आहे. मात्र हे आरोप बिनबुडाचे असल्याचं अकबर यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीआधी आपली प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूनंच हे आरोप होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अकबर यांचं निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी करांजवाला अँड कंपनीकडे आहे. 'आमच्या लॉ फर्मकडे 100 वकील आहेत. यातील 6 जण गुन्हेगारी प्रकरणात अशिलाची बाजू मांडतात. तेच वकील या प्रकरणात अकबर यांच्या वतीनं युक्तीवाद करतील,' अशी माहिती लॉ फर्मच्या प्रवक्त्यांनी दिली.