वाटेतच अडकली मेट्रो, श्वास गुदमरून बेशुद्ध झाली महिला प्रवाशी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 12:43 PM2017-10-09T12:43:07+5:302017-10-09T12:45:38+5:30
आरामदायक प्रवासासाठीचा उत्तम पर्याय म्हणून ओळखली जाणारी मेट्रो मध्येच बंद पडल्यास काय होऊ शकते याचा अनुभव प्रवाशांनी रविवारी घेतला.
नवी दिल्ली - आरामदायक प्रवासासाठीचा उत्तम पर्याय म्हणून ओळखली जाणारी मेट्रो मध्येच बंद पडल्यास काय होऊ शकते याचा अनुभव प्रवाशांनी रविवारी घेतला. नवी दिल्लीतील मेट्रोमार्गावर तांत्रिक बिघाडामुळे एक मेट्रो ट्रेन वाटेतच अडकली. या बंद पडलेल्या मेट्रो ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आपातकालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले. मात्र यादरम्यान एक महिला प्रवाशी बेशुद्ध झाली.
दिल्लीतील शात्री पार्क आणि काश्मीर गेट मेट्रो स्थानकांदरम्यान सवीवारी सकाळी 6 वाजून 40 च्या दरम्यान हा प्रकार घडला. मेट्रो ट्रेन काश्मीर गेट स्थानकाजवळ पोहोचत असतानाच ट्रेनच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊन मेट्रो ट्रेन जागीच थांबली. दरवाजे बंद असल्याने ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. घटनेची खबर त्वरित प्रशासनास देण्यात आली. त्यानंतर मेट्रोची क्विक रिस्पॉन्स टीम घटनास्थळी पोहोचली त्यांनी आपातकालीन द्वार उघडून प्रवाशांना बाहेर काढले. मात्र याच दरम्यान, एक महिला बेशुद्ध पडली. या महिलेला स्ट्रेचरवरून बाहेर काढून त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या बिघाडानंतर शास्री पार्क आणि काश्मीर गेट स्थानकांदरम्यान, मेट्रो सेवा एकेरी मार्गावरून चालवण्यात आली. मेट्रो बंद पडली तेव्हा आम्ही आता अडकलो, असे आम्हाला वाटले, मात्र सुदैवाने आमची सुखरूप सुटका झाली. जर वेळीच आपातकालीन दरवाजे उघडले नसते तर प्रवाशांना अडचण झाली असती, असे मेट्रोमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी सांगितले. रविवारचा दिवस असल्याने प्रवाशांची गर्दी कमी होती, इतर दिवशी अशी घडना घडली असती तर अडचणी वाढल्या असत्या, असेही प्रवाशांकडून सांगण्यात आले.
इकडे मुंबईत मेट्रो-३ प्रकल्पामुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करणा-या जनहित याचिकेवर उत्तर देताना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) मेट्रो मुंबईची गरज असल्याचे म्हटले आहे. मुंबईत उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत आहे. ही सेवा अपुरी असल्याने जलदगतीने मेट्रो-३ प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे, असे एमएमआरसीएलने उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले.