तिबेटी सैनिक निमा तेनझीन यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार; भारताचा चीनला थेट संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 12:30 AM2020-09-09T00:30:26+5:302020-09-09T07:03:19+5:30
लडाख सीमेवर भूसुरुंग स्फोटात वीरमरण; स्वतंत्र तिबेटच्या दिल्या घोषणा
नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या भारत-चीन सीमावादात भारतीय लष्कराने केलेल्या एका कारवाईत भूसुरुंग स्फोटात तिबेटियन स्पेशल फ्रंटिअर फोर्समधील मूळ तिबेटियन कंपनी कमांडर निमा तेनझीन यांना वीरमरण आले. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर लेह येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित तिबेटी नागरिकांनी स्वतंत्र तिबेटच्या घोषणा देत भारत आणि तिबेटच्या ध्वज फिरवत चिनी नेतृत्वाला थेट आव्हान दिले.
२९-३० ऑगस्टदरम्यान स्पेशल फ्रंटिअर फोर्सच्या विकास बटालियनने पेंगाँत्से सरोवराच्या दक्षिण भागातील मोक्याच्या प्रदेशावर नियंत्रण मिळवले. यादरम्यान भूसुरुंगाच्या स्फोटात एसएफएफ दलातील कंपनी कमांडर निमा तेनझीन यांना वीरमरण आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेता राम माधव, तसेच स्थानिक खासदार उपस्थित होते.
याबाबत संरक्षक विश्लेषक निवृत्त मेजर जनरल डी.के. मेहता यांनी सांगितले, की भारताने ‘वन चीन पॉलिसी’ स्वीकारली. त्याअंतर्गत तिबेटला चीनचा भाग्य असल्याचे मान्य करण्याचा मुद्दाही होता. मात्र, चीन सातत्याने सीमेवर कुरापती करीत असतो. एवढेच नव्हे तर पाकव्याप्त भारतीय भूभागात चीन रस्त्यांचे जाळे तयार करीत आहेत. यामुळे तिबेटबाबतच्या धोरणात भारताने बदल करणे गरजेचे होते.
१९६२ मध्ये स्पेशल फ्रंटिअर फोर्सची झाली होती स्थापना
1962 युद्धानंतर भारतात शरण आलेल्या तिबेटी नागरिकांच्या मदतीने ‘स्पेशल फ्रंटिअर फोेर्स’ची स्थापना केली होती. यापूर्वी तिला ‘एस्टॅब्लिशमेंट २२’ या नावाने ओळखले जात होते. याआधी भारताने उघडरीत्या या फोर्सबाबत वक्तव्य केले नव्हते. मात्र, भारताने आता तिबेट धोरणाबाबत बदल करीत चीनला थेट संदेश देण्याचे ठरवले आहे.
2018 मध्ये तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या ६० वर्षांच्या निर्वासित दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांपासून भारतीय नेत्यांना दूर राहण्यास केंद्र सरकारने सांगितले होते. कारण तिबेट हा चीनचा भाग आहे, हे भारतीयांनी आधीपासून मान्य केले आहे. मात्र, भारत आता या भूमिकेत बदल करीत आहे.