शिमला - देशभरातील विविध राज्यांत सध्या पावसामुळे रस्ते खचले आहेत. पुराच्या पाण्यामुळे नद्यांचा प्रवाह विस्तीर्ण आणि धोकादायक पातळी ओलांडून वाहत आहे. त्यातच, दरड कोसळून अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामध्ये शेकडो नागरिकांना आपला जीव गमावला आहे. काही दिवसांपूर्वीचहिमाचल प्रदेशातील कनौर येथे दरड कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला होता. अद्यापही येथील नद्यांना पूर असल्याने प्रवास धोकादायकच बनला आहे. विशेष म्हणजे हिमाचल प्रदेशच्यामंत्री महोदयांनाही चक्क हातावर चालून रस्ता पार करावा लागला आहे.
महाराष्ट्रातील कोकण आणि प. महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असून नेतेमंडळींचे दौरे सुरू आहेत. पावसाने थोडीशी विश्रांती घेतली असली तरी अद्यापही नद्यांचा प्रवाह मोठ्या गतीने वाहत आहे. महाराष्ट्रातील दरड कोसळल्याच्या घटना ताज्या असतानाच हिमाचल प्रदेशमध्येही दरड कोसळून भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये, 9 पर्यटकांचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशमध्येही पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.