मंत्री, भाजपच्या नेत्यांनाही भूमिपूजनाचे निमंत्रण नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 06:22 AM2020-08-04T06:22:32+5:302020-08-04T06:23:05+5:30
अयोध्येत कडक बंदोबस्त : समारंभाच्या परिसरात प्रवेश बंद
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनाकरिता श्रीराम जन्मभूमी न्यासाने मोदी सरकारमधील एकाही केंद्रीय मंत्र्याला निमंत्रण दिलेले नाही तसेच एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याला या कार्यक्रमाला बोलाविले नाही. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही नाव निमंत्रितांच्या यादीत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी अयोध्येत जाऊन संपूर्ण तयारीचा आढावा घेतला. पोलिसांनी शहराचा पूर्ण ताबा घेतला असून, उद्या दुपारनंतर अयोध्येबाहेरील कोणालाही शहरांत प्रवेश करता येणार नाही. गेल्या दोन दिवसांत पत्रकार वा अन्य कोणी आले आहेत, त्यांचीही माहिती पोलिसांनी घेऊन ठेवली आहे.
राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे स्वरूप धार्मिक असावे यावर श्रीरामजन्मभूमी न्यासाचा कटाक्ष आहे. हा न्यास एखाद्या विशिष्ट पक्षाच्या बाजूने झुकलेला आहे, असे चित्र निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्यात येत आहे. त्यामुळेच अगदी भाजपच्या नेत्यांनाही या लांब ठेवण्यात आले आहे. कार्यक्रम या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा असतानाही भाजपला त्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय श्रीराम जन्मभूमी न्यासाने घेतला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे मंत्री राजनाथसिंह यांनाही कार्यक्रमापासून दूरच ठेवण्यात आले आहे. भूमिपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण होणार आहे. राम जन्मभूमी आंदोलनातील अग्रगण्य नेते लालकृष्ण अडवाणी व मुरलीमनोहर जोशी यांना का बोलाविले नाही या प्रश्नावर आलोककुमार म्हणाले की, निमंत्रितांच्या यादीत या दोन ज्येष्ठ नेत्यांची नावे आहेत. मात्र या उपस्थित राहायचे की नाही हा निर्णय या दोघांनी घ्यायचा आहे.
ते म्हणाले की, राममंदिर बांधण्यास मुस्लिमांसह अन्य धर्माच्या एकाही नेत्याने विरोध केला नाही ही आनंददायी घटना आहे. एआयएमआयएम या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहू नये अशीच सूचना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काळजी : उमा भारती
आपण भूमिपूजनासाठी अयोध्येला जात असलो तरी कार्यक्रमाला हजर राहणार नाही, असे उमा भरती यांनि सांगितले. त्या म्हणाल्या की, रेल्वेने जाणार असल्याने अन्य प्रवाशांशी माझा संपर्क येईल. त्यामुळे समारंभात माझ्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये. विशेषत: मला पंतप्रधान मोदी यांची काळजी आहे. समारंभ संपल्यावर मी त्या ठिकाणी जाईन.
व्यासपीठावर मोदी व भागवत
राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, रामजन्मभूमी न्यासाचे प्रमुख नृत्यगोपाल दास, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.
राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्यासाठी सर्व धर्मांचे प्रतिनिधी तसेच सर्व मठांचे प्रमुख धर्मगुरू यांना निमंत्रण देण्यात आले आहे. निमंत्रितांमध्ये विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस मिलिंद परांडे, बजरंग दलाचे प्रमुख सुरेंद्र जैन व आणखी काही लोकांचा समावेश आहे. तसेच देशातील १३३ संत व महंतांना निमंत्रण देण्यात आले आहे.
- आलोककुमार, कार्यकारी अध्यक्ष, विश्व हिंदू परिषद