नवी दिल्ली : कोरोनावर मात करणाऱ्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतात सुद्धा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि हैदराबादमधील भारत बायोटेकने कोरोनावरील लस तयार केली असून या लसीचा आपातकालीन वापर करण्याची परवानगी मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज पाठवले आहेत. मात्र, या लसींची सुरक्षितता आणि प्रभावीपणाबद्दल पुरेशी माहिती दिलेली नसल्यामुळे हे अर्ज मंजूर झाले नाहीत, अशा बातम्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
यासंदर्भातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या अशा बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचे म्हटले आहे. लसींच्या आपातकालीन वापरासंबंधी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकद्वारे करण्यात आलेले अर्ज फेटाळण्यात आले, अशा सर्व बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे.
दरम्यान, कोरोनावर प्रभावी ठरू शकणाऱ्या ‘कोविशिल्ड’ लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने गेल्या सोमवारी केंद्र सरकारकडे अर्ज केला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी ट्विट करून ही माहिती दिली. केंद्राकडून परवानगी मिळाल्यास लसीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळू शकणार आहे. दुसरीकडे, हैदराबादमधील फार्मास्युटिकल कंपनी भारत बायोटेकनेही कोरोना लसीच्या आपत्कालीन स्थितीतील वापरासाठी परवानगी मागितली आहे.