ढोंगी बाबांच्या यादीत रामदेव बाबांचं नाव नाही हे पाहून दुख: झालं - दिग्विजय सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 12:38 PM2017-09-12T12:38:07+5:302017-09-12T12:44:25+5:30
भोंदू बाबांच्या यादीत योगगुरु बाबा रामदेव यांचं नाव नसल्याचं पाहून आपल्याला दुख: झाल्याचा टोला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी लगावला आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहे.
नवी दिल्ली, दि. 12 - भोंदू बाबांच्या यादीत योगगुरु बाबा रामदेव यांचं नाव नसल्याचं पाहून आपल्याला दुख: झाल्याचा टोला काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी लगावला आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहे. रविवारी अलाहाबादमध्ये आखाडा परिषदेची बैठक झाली. या बैठकीनंतर देशातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर करण्यात आली. अलाहाबादमध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक झाली. बैठकीनंतर आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांनी धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणा-या 14 ढोंगी बाबांची यादी जाहीर केली.
यादीत आसाराम बापू, संत रामपाल आणि गुरमीत राम रहीमच्या नावाचा समावेश आहे. दिग्विजय सिंह यांनी यासंबंधी ट्विट करत लिहिलं आहे की, 'यादीत बाबा रामदेव यांचं नाव नाही हे पाहून आपण हताश झालो आहोत'. यावेळी दिग्विजय सिंह यांनी बाबा रामदेव बनावट वस्तू विकून फसवणूक करत असल्याचाही आरोप केला आहे. 'खोट्याला खरं सांगून बाबा रामदेव वस्तू विकत आहे', असं दिग्विजय सिंह बोलले आहेत.
सम्माननीय अखाड़ा परिषद ने इस सूचि में बाबा रामदेव का नाम नहीं रखा। निराशा हुई। पूरे देश को ठग रहा है। नक़ली को असली बता कर बेंच रहा है। pic.twitter.com/kmxzEUrVXN
— digvijaya singh (@digvijaya_28) September 11, 2017
यावेळी दिग्विजय सिंह यांनी बाबा रामदेव यांचं नावही यादीत समाविष्ट करण्याची विनंती केली आहे. अन्यथा तुम्हीही बाबा रामदेव यांच्याकडून मिळणा-या पैशांमुळे प्रभावित झाल्याचा निष्कर्ष निघेल असं दिग्विजय सिंह बोलले आहेत.
हे आहेत ढोंगी बाबा -
- आसाराम बापू उर्फ आशुमल शिरमलानी
- सुखबिंदर कौर उर्फ राधे मां
- सच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता
- गुरमीत राम रहीम सिंह
- ओमबाबा उर्फ विवेकानंद झा
- निर्मल बाबा उर्फ निर्मलजीत सिंह
- रामपाल
- आचार्य कुशमुनि
- वृहस्पति गिरी
- मलखान सिंह
- इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ति द्विवेदी
- स्वामी असीमानंद
- ओम नमः शिवाय बाबा
- नारायण साईं
संत उपाधी देण्याबाबतही निर्णय-
यावेळी अखिल भारतीय अखाड़ा परिषदेने 'संत' उपाधी देण्यासाठी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित व्यक्तीची संपूर्ण पडताळणी करुन त्याचं आकलन करून नंतरच संत ही उपाधी बहाल केली जाणार आहे. याद्वारे गुरमीत राम रहीम सारख्या लोकांकडून होत असलेल्यी धर्माच्या नावाखालील फसवणुकीला आळा बसेल. विश्व हिंदू परिषदेचे (विहिप) संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन म्हणाले, एक-दोन भोंदू व्यक्तींमुळे सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यामुळे संत उपाधी देणयाआधी संपूर्ण पडताळणी केली जाणार आहे.
सरकारला पाठवणार यादी-
या ढोंगी बाबांची यादी सरकारला पाठवणार असल्याची माहिती आहे. जेणेकरून अशा ढोंगी बाबांविरोधात कारवाई केली जावी असा त्या मागचा उद्देश आहे. दरम्यान या बैठकीपूर्वी नरेंद्र गिरी महाराज यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. बैठकीपूर्वी एक दिवस फोनवरुन ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी त्यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धमकी देणारा व्यक्ती आपण आसाराम बापूचा शिष्य असल्याचं सांगत आहे.