बीजिंग: भारताच्या मानुषी छिल्लरनं मिस वर्ल्ड 2017 चा किताब जिंकला आहे. चीनमध्ये मिस वर्ल्ड 2017चा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 118 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. हरियाणाची असलेली मानुषी छिल्लर 20 वर्षांची आहे. या स्पर्धेत दुस-या स्थानावर मिस मेक्सिको आणि तिस-या क्रमांकावर मिस इंग्लंडनं मान मिळवला आहे. यापूर्वी 2000 मध्ये प्रियांका चोप्रा हिने मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता.
प्रश्नोत्तराच्या फेरीत मानुषीने आईविषयी दिलेल्या उत्तरानं सर्वांची मनं जिंकली. जगात सर्वात जास्त पगार आणि आदर कोणत्या प्रोफेशनला मिळायला पाहिजे ?, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर मानुषी म्हणाली, मी माझ्या आईच्या जवळ आहे. माझ्यामते आईला आदर आणि प्रेम मिळायलाच पाहिजे. पगारापेक्षाही तुम्ही तिला जास्त प्रेम दिले पाहिजे. माझ्यासाठी माझी आई प्रेरणास्थान आहे. जगातील प्रत्येक माता तिच्या मुलांसाठी असंख्य तडजोडी करत असते. त्यामुळे माझ्या मते ‘आई’ हे एक असे प्रोफेशन आहे, जिला सर्वात जास्त आदर आणि पगार असायला हवा, असे तिने सांगितले. आईला कॅश सॅलरी देऊन भागणार नाही, तिचा गौरव व्हावा. तिला भरपूर प्रेम मिळायला हवे.'
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर ही हरियाणातील सोनीपत येथील राहणारी आहे. ती मेडिकलची विद्यार्थिनी आहे. 7 मे 1997 रोजी दिल्लीत मानुषीचा जन्म झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फॅन असलेल्या मानुषी हिला माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रासारखे बनण्याची इच्छा आहे.