आपण यांना पाहिलंत का? भाजपा खासदार सनी देओल यांच्याबाबत मतदारसंघात लागले पोस्टर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 10:01 AM2020-01-13T10:01:53+5:302020-01-13T10:20:20+5:30
निवडून आल्यानंतर मतदारसंघात न फिरकल्याने सनी देओल हरवल्याचे पोस्टर मतदारसंघात लागले आहेत
पठाणकोट - सिनेजगतातील अनेक अभिनेते, अभिनेत्री लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण करत असतात. त्यापैकी काही निवडणुका लढवून लोकप्रियतेच्या जोरावर निवडूनही येतात. मात्र निवडणूक जिंकल्यानंतर ही मंडळी आपल्या दैनंदिन व्यापात गुंतून जातात. मग त्यांचे आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होते. असाच काहीसा प्रकार भाजपाच्या तिकीटावर खासदार झालेल्या सनी देओल यांच्याबाबत घडला असून, निवडून आल्यानंतर मतदारसंघात न फिरकल्याने सनी देओल हरवल्याचे पोस्टर मतदारसंघात लागले आहेत.
बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेले सनी देओल हे पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील जाखड यांना 80 हजारांहून अधिकच्या मताधिक्याने पराभूत केले होते. मात्र निवडून आल्यानंतर मतदारसंघाकडे फारसे न फिरकल्याने त्यांच्याविरोधात स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यातूनच मतदारसंघातील प्रमुख शहर असलेल्या पठाणकोट येथे सनी देओल हे हरवल्याचे पोस्टर्स लागले आहेत. मात्र हे पोस्टर्स कुणी लावले हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.
Punjab: 'Missing' posters of Sunny Deol, BJP MP from Gurdaspur constituency, seen in Pathankot pic.twitter.com/SHGpMsxlaq
— ANI (@ANI) January 13, 2020
दरम्यान, सनी देओल यांच्या एका निर्णयावरून याआधीही वाद झाला होता. सनी देओल यांनी आपल्याकडून सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून गुरप्रीत सिंह पलहेरी यांची नियुक्ती केली होती. त्यावरून मोठा वाद झाला होता. आपले प्रतिनिधी म्हणून पलहेरी हे मतदारसंघातील सर्व प्रकरणांवर लक्ष घालतील, अशी घोषणा सनी देओल यांनी केली होती. मात्र त्याला भाजपाच्याच नेत्यांनी विरोध करत या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.